पृष्ठे

मंगळवार, ३ मार्च, २०१५

स्वयंभू



शब्दांच्याही पार पलीकडे एक जग असतं… अनुभूतीचं… निःशब्द… शांत… धीरगंभीर असं. विचारांचं वादळ जेव्हा मंदावत जातं तेव्हा मनाच्या तळ्यात एक निरव शांतता पसरत जाते… सगळं स्तब्ध होत जातं… स्वप्नं, आकांक्षा, कल्पना, इच्छा, हव्यास, सुख-दुःखं यांचा सगळा गाळ खोल तळाशी जाऊन बसतो आणि एव्हाना धूसर दिसणाऱ्या कित्येक गोष्टी स्पष्ट दिसू लागतात… खिडकीच्या काचा पुसल्यावर बाहेरचं जग दिसावं तेवढ्या आणि तशा. त्या तळ्याच्या काठावर आठवणींचा भला मोठा पिंपळवृक्ष उभा असतो. क्वचितच त्याचं एखादं पान पाण्यावर अगदी अलगद उतरतं. हळुवारपणे ते पाण्यावर तरंगायला लागतं आणि मग केव्हातरी तेही तळाशी जाऊन स्थिरावतं. सगळी इंद्रिये पार थकून तळ्याकाठी विसावा घेत असतात. कुणीच काही बोलत नाही. सगळे आपापलं अस्तित्व अनुभवत असतात. तशात एक सत्य प्रकर्षानं जाणवतं ते हे की आपण उगाच आपल्या अस्तित्वाचा डांगोरा पिटत असतो… अनुभूतीचा टेंभा मिरवत असतो… कल्पनांचे पिसारे फुलवत असतो… सुखाचं प्रदर्शन मांडत असतो… दुःखाचा ढोल वाजवत असतो… या सगळ्यांशिवाय आणि या सगळ्यांच्या पलीकडे अस्तित्व असतं आणि ते नितांत सुंदर असतं, हळुवार असतं, सुखद असतं, आनंदघन असतं आणि मुख्य म्हणजे स्वयंभू असतं. 

शुक्रवार, २० फेब्रुवारी, २०१५

उद्या

चला रात्र झाली, निरव शांतता सगळीकडे पसरली आणि मनाचे आवाज ऐकू येत आहेत. असं इअरफोन कानात टाकून लिहायचा योग बऱ्याच दिवसांनी आलाय. वेळ नव्हता असं नाही, इच्छा नव्हती असंही नाही पण लिहायला जी एक उर्मी लागते ती नव्हती. असो. 

आयुष्यात उद्या आहे म्हणून आज आनंद आहे. कारण उद्याच्या बळावर आज आशा जिवंत आहे आणि नुसती जिवंतच नाही तर तिला स्वप्नांचे धुमारेही फुटलेले आहेत. हे असं स्वप्नं पाहणं जिवंत असल्याचं लक्षण आहे, नाही का? एक विचार किंवा एक इच्छा, मग एक आशा, मग भव्य स्वप्नं, आणि मग त्यांची पूर्ती किंवा त्यांचा चक्काचूर आणि मग अजून एक नवा विचार हेच तर आयुष्य. 

शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २०१५

गर्दी

"क्लासमेट"मध्ये एक डायलॉग आहे: "गर्दीत… प्रत्येक कॉलेजमध्ये गर्दीत पोरं नसतात का? स्कॉलर नसलेली, कला बिला न येणारी, पोरी पटवायची फक्त इच्छा असलेली… तशातलाच एक". मला तर हे आपलंच वर्णन वाटतंय. अजून बऱ्याच जणांना तसं वाटत असणार. आम्हीही असेच गर्दीतले एक. तेव्हा आणि आताही. पण गर्दीतून बाहेर येण्याचा अट्टाहास मात्र मुळीच नाही. कारण गर्दीला चेहरा नसला तरी गर्दीतल्या प्रत्येकाला तो असतोच. गर्दीतही प्रत्येक जण आपलं स्वतःचं एक विश्व जपतो, स्वतःचं अस्तित्व बाळगतो.  आणि मला म्हणाल तर लक्षवेधी असण्यापेक्षा गर्दीत मिसळून जाणंच छान वाटतं.    

आमच्यासारख्या गर्दीतल्या पोरांच्या काही सवयी असतात… स्वभावच म्हणा हवं तर. आम्ही मुद्दामहून नजरेत भरेल असं काहीही कधीही करत नाही. आमचं बरंच काही मनातल्या मनातच चालू असतं. कुणी म्हणजे अगदी कुणीही अगदी एक टक आमच्याकडे पाहत असेल तर आम्हांला अस्वस्थ वाटायला लागतं. या अशा स्वभावामुळेच गर्दीत सुरक्षित वाटतं. खरं म्हणजे गर्दी ही आमच्यासाठी सुरक्षा कवच असते. 

शुक्रवार, ६ फेब्रुवारी, २०१५

आशा निराशेच्या हिंदोळ्यावर माणसाला कसं हेलकावत ठेवायचं ते नियतीला अगदी बरोब्बर कळतं. 'आता आपली नाव बुडून पार रसातळाला जाणार' असं वाटत असतानाच दूर कुठेतरी एखादं बेट धुसरसं दिसायला लागतं आणि मग आपण पंचप्राण एकवटून त्या दिशेने जायला लागतो. पण तिथे पोहचल्यावर मात्र 'यापेक्षा आधीची परिस्थिती काय वाईट होती' अशी अवस्था होते. नियतीने आपला डाव खेळलेला असतो. 

गुरुवार, १५ जानेवारी, २०१५

कुठला रस्ता ?




हिवाळ्यातली सुंदर सकाळ. मी आपला मुक्तपणे बाईकवरून भटकायला निघालोय. काळसर पायघडीसारखा लांबवर पसरलेला काळा रस्ता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पहुडलेली हिरवी शेतं आणि सगळ्या परिसरावर हळूच पसरलेली धुक्याची निळसर चादर. नुकतीच रात्रीच्या निद्रेतून जागी झालेली चराचर सृष्टी. रस्त्याच्या त्या टोकाला उगवणारा लालसर सूर्य आणि झाडांच्या लांबच लांब पडलेल्या फिकट सावल्या. अंगाला झोंबणारे थंड हवेचे झोत. हा प्रवास असाच चालू राहावा असं वाटतंय. कुठे जायचं ते मात्र काही माहित नाही. पण संध्याकाळ व्हायच्या आत घरी परत जायचंय एवढं मात्र निश्चित. मी आपला निवांतपणे चाळीसच्या स्पीडने चाललोय. या रस्त्याला मैला-मैलावर अनेक फाटे फुटतात आणि मग कोणता मार्ग निवडावा हे काळात नाही. सगळेच मार्ग चोखाळावेसे वाटतात पण ते शक्य नाही. या मार्गांपैकी एक मार्ग निवडताना खूप घालमेल होते कारण बाकीचे मार्ग आपले नव्हेत हि वेदना त्यात असते. कुठला एक मार्ग निवडण्यापेक्षा पुढच्या मैलावर असे अनेक फाटे आहेत हेच फार सुखावह असत. कारण 'अनेक पर्याय आपल्याला खुले आहेत' ही भावना त्यामागे असते. एखादा रस्ता निवडला की परत फिरून दुसरा रस्ता निवडणं एक तर अशक्य किंवा अवघड. आयुष्याचंही असंच असतं, नाही का? आपल्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत याचा आनंद फार असतो, पण जेव्हा उपलब्ध पर्यायांमधून एक निवडण्याची वेळ येते तेव्हा मात्र घालमेल होते. 'आपण चुकत तर नाही ना' असं सतत वाटत राहतं. कारण एकदा का तुम्ही एक पर्याय निवडला कि तो कायमचा तुमच्या पुढच्या आयुष्याशी जुळतो मग तिथून माघारी फिरणे अवघड. कधी कधी आपण निवडलेल्या पर्यायापेक्षा बाकीचे सगळेच पर्याय चांगले वाटायला लागतात आणि दुःखाची गोष्ट म्हणजे ते खरंच तसं आहे का हे मात्र आपल्याला कधीच कळत नाही. 

गुरुवार, ११ डिसेंबर, २०१४

आपला पूर्वग्रहदूषित समाज

कोणतीही घटना घडली की निष्कर्षावर येण्याची घाणेरडी सवय आपल्याला लागलेली आहे. आपली माध्यमेसुद्धा पूर्वग्रह दुषित आहेत किंबहुना त्यांचा एक रंगीत चष्माच आहे आणि त्यातूनच ते सगळ्या घटनांकडे पाहतात आणि त्याच रंगाने सगळ्या घटना रंगवतात. आणि सोशल मिडियासुद्धा या पूर्वग्रहापासून मुक्त कसा राहील? तिकडेसुद्धा ही लागण पोहचलीच. खालची दोन उदाहरणं अगदी बोलकी आहेत. 

उदाहरण एक: जावखेडा हत्याकांड 
मागच्या ऑक्टोबर महिन्यात नगर जिल्ह्यातल्या जावखेडा इथे एका दलित कुटुंबातल्या तीन जणांची हत्या झाली आणि एका सुरात मिडिया आणि तथाकथित पुरोगामी यांनी ओरडायला सुरुवात केली की यामागे (तथाकथित) उच्चवर्णीयांचा हात आहे. म्हणजे मागचा पुढचा विचार न करता सगळ्यांनी जणू हे गृहीतच धरलं होतं की यामागे नक्कीच उच्चवर्णीयांचा हात असणार. आणि नंतर तपासात जे पुढे आलं ते य गृहितकाला फाटा देणारं होतं. या हत्याकांडात दलित हा शब्द अधोरेखित करण्यात आला होता. केवळ याच नाही तर दलितांशी निगडीत कोणत्याही घटनेत दलित हा शब्द अधोरेखितच असतो आणि दलित हेच नेहमी पिडीत आणि सवर्ण हेच गुन्हेगार हे साधारण गृहीतकच आहे नाही का. म्हणजे दलितांचा कैवार घेतल्याशिवाय तुम्ही पुरोगामी कसे होणार ना? त्यामुळे मग करा दलितांना अधोरेखित.  मग जेव्हा एखाद्या दालीताचा खून होतो, किंवा एखाद्या दलित महिलेवर बलात्कार होतो तेव्हा हे गृहीतक आपोआपच लागू केलं जातं आणि पुढची सगळी सिद्धता याच गृहितकाभोवती फिरते. मग सगळे सवर्णांना, त्यांच्या परंपरांना, त्यांच्या रूढींना अगदी त्यांच्या धर्मालासुद्धा वाट्टेल ती दुषणे देऊन मोकळे होतात. एखाद्या समाजावर पिढ्यानपिढ्या झालेला अन्याय दूर करण्यासाठी आज दुसऱ्या समाजावर अन्याय करावाच लागणार, नाही का? त्याशिवाय समाजाची पापं कशी धुतली जाणार, नाही का?  

उदाहरण दोन  
मागे रोहतकच्या दोन बहिणींचा एक व्हिडीओ मिडीयाने अक्षरशः उचलून धरला. त्यात त्या दोघीजणी एक की दोन मुलांना पट्ट्याने मारत असल्याचं चित्रण होतं. सोशल मिडियावरसुद्धा त्या व्हिडीओला कित्येक शेअर्स आणि लाईक्स मिळाले. त्यानंतर त्याची दुसरी बाजू बाहेर आली तेव्हा आणि आता असं दिसतंय कि यात त्या बिचाऱ्या मुलांचा काहीच दोष नव्हता. इथेही एक गृहीतक आपल्याला प्रकर्षाने पाहायला मिळतं ते असं की जेव्हा एक पुरुष आणि एक स्त्री यांच्यात वाद असतो तेव्हा गुन्हा हा पुरुषाचाच असतो. इथेही तेच… स्त्रीवाद म्हणजे पुरोगामीपणा अशी अजून एक व्याख्या झाली आहे ना आज आणि आपण कसे आणि किती पुरोगामी हे दाखवण्याची एक स्पर्धा सगळीकडेच दिसत आहे. 

वरच्या दोन उदाहरणांवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे ती अशी की आपण, आपला अख्खा समाज, आपल्या सगळ्या यंत्रणा हे पूर्वग्रहाने पछाडलेले आहेत. म्हणजे पहा की दलित आणि सवर्ण यांत सवर्णच दोषी असणार, स्त्री आणि पुरुष यांत पुरुषच दोषी असणार, गरीब आणि श्रीमंत यांत श्रीमंतांनाच मज चढलेला असणार, सायकलस्वार आणि करचालक यांत कारचालकच दोषी असणार, नाही का? अगदी याच गृहीतकांवर आपले कायदे सुद्धा आधारित आहेत. शेवटी दुसरी बाजू इथे पहायचीय कुणाला? एका आणि एकाच बाजूचे आम्ही पुरस्कर्ते आणि तेच आमच्या सोयीचं आहे ना. त्याशिवाय आम्हांला पुरोगामी कोण म्हणणार? 

गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०१४

मी काही लई भारी लिहितो असा दावा करत नाही पण कधी कधी असं होतं कि मी माझाच ब्लॉग जेव्हा वाचतो तेव्हा एखादी चांगली पोस्ट वाचून वाटतं कि 'अरेच्चा, हे मी लिहिलंय?  कसं काय सुचलं बुवा आपल्याला हे?' पण असं जेव्हा वाटतं तेव्हा थोडासा आनंदही होतोच. आणि का नाही होणार? आपले विचार नेमक्या शब्दांमध्ये गुंफता येणं हे आनंददायीच असतं. ते नेहमीच जमतं असं नाही. कधी कधी शब्दांची ओढाताणही करावी लागते. असे ओढाताण करून लिहिलेले कित्येक ड्राफ्ट  ब्लॉगवर पडून आहेत. 

शुक्रवार, १० ऑक्टोबर, २०१४

वास्तव आणि अवास्तव

आपल्या अपेक्षा आपल्या इगोचंच प्रतिबिंब नसतात का? निदान मला तरी तसं वाटतं. नाहीतर स्वतःच स्वतःला सिद्ध करण्याच्या भानगडीत कोण कशाला पडतो? पण वास्तव आणि अवास्तव अपेक्षा यांच्यातली सीमारेषा कुठेय? निदान ती निश्चित करून घेतली पाहिजे… पण आपला इगो पण बडी कमाल की चीज है भाई. स्वस्थ बसू देईल तर शपथ. अर्धा असलेला ग्लास पूर्ण भरल्याशिवाय चैन नाही. आणि याहून विशेष म्हणजे हे सगळं कळतं हो पण वळत नाही ना. 

बुधवार, ८ ऑक्टोबर, २०१४

आदर्शवाद

तुम्हांला वाटतं का की आपण आदर्शवादाच्या फारच आहारी गेलो आहोत? संस्कृती, परंपरा, धर्म वगैरेंच्या नावाखाली खोट्या समजुतींना घट्ट धरून बसलो आहोत? आम्हांला प्रत्येक पुरुष हा मर्यादापुरुषोत्तम राम आणि प्रत्येक स्त्री ही सीता असावी असं वाटतं. आम्हांला अगदी आदर्श नागरिक हवे असतात. लहानपणापासून प्रत्येकानेच कसं आदर्श असलं पाहिजे याचे पाठ पढवले जातात. घरी दारी शाळेत अगदी सगळीकडेच. कुणी एखादा चुकला कि राईचा पर्वत करून त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण केला जातो. मग लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच या खोट्या आदर्शवादाच्या भोवऱ्यात सापडून वाहत जातात. ते कधी वर येतच नाहीत. हा आदर्शवाद पिढ्यानपिढ्या तसाच पुढे पसरत जातो. आम्ही आमच्या महापुरुषांमध्येही देवाचा अंश शोधत बसतो. त्यामुळे त्यांचं माणूस असणंच नाकारतो आणि मग त्यांच्या चुकाही साहजिकच नाकारतो. किंबहुना त्यांना चुका करण्याची मुभाच देत नाही. पण माणसाला देव करण्यापेक्षा त्याला माणूस म्हणून त्याच्या चुकांसाहित स्वीकारायला आपला समाज कधी शिकणार? 'आमचा मुलगा आमच्या शब्दाबाहेर नाही' असं सांगताना कित्येक आई वडिलांची छाती अभिमानाने फुलून येते पण त्या मुलाच्या इच्छेचं काय? त्याच्या स्वप्नांचं काय? इथे मतभेद असण्याची शक्यताच मुळी नाकारली जाते. अशा सतत आदर्शांच्या दडपणात जागणाऱ्या समाजात कोण कसं सुखी होणार? 

शनिवार, ४ ऑक्टोबर, २०१४

हैदर

हैदर एक चांगली कलाकृती आहे. पण त्यामध्ये भारतीय सैन्याचं जे चित्रण केलंय ते मात्र धडधडीत खोटं आहे आणि फुटीरवाद्यांना सपोर्ट करणारं आहे. मला एक गोष्ट कळत नाही की बॉलीवूडवाले फुटीरवाद्यांच्या एवढं का प्रेमात पडलेत. इतकंच प्रेम उफाळून येत असेल तर पाकिस्तानात जाऊन चित्रपट बनवा आणि तिकडेच प्रदर्शित करा. हे म्हणजे भारताच्या तुकड्यांवर जगायचं आणि पाकचे गुणगान गायचे असं झालं. फक्त बॉलीवूडवालेच नाही तर अरुंधती रॉयसारखे तथाकथित पुरोगामीसुद्धा हाच सूर आळवतात. म्हणजे त्यांच्या आणि नवाझ शरीफ वगैरेंच्या विचारांत किती एकवाक्यता असते पहा. नवाझ शरीफ यांचं मागे संयुक्त राष्ट्रामध्ये जे भाषण झालं अगदी त्याचा प्रतिध्वनी वाटावा असा हैदर हा चित्रपट आहे. हे असं का हो ? ज्या भारतीय सैन्याने पुराच्या थैमनतुन काश्मिरींना वाचवलं, जे भारतीय सैन्य दिवस रात्र डोळ्यात तेल घालून यांचं आणि देशाचं रक्षण करतं त्याच सैन्याचं असं चित्रण करून काय साधायचंय यांना? कि काहीतरी वादग्रस्त केल्याशिवाय यांचं समाधान होतच नाही? हा सरळ सरळ देशद्रोह नाही तर काय आहे? अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे जे काय असेल ते असेल हो, पण अभिव्यक्तीच्या नावाखाली तुम्ही जो खोटेपणाच बोंबलून जगाला सांगता आणि फुटीरवाद्याचं जे गलिच्छ उदात्तीकरण करता त्याचं काय? Hamletवर चित्रपट बनवायला यांना काश्मीरची पार्श्वभूमी का घ्यावी लागते ते काळात नाही बुवा. यांचं फंडिंग अल कायदा किंवा तत्सम दहशतवादी संघटनांकडून होत असणार. अन्यथा कोणत्या देशातले लोक त्यांच्याच देशाचं असं demeaning portrait रंगवतात.