तुम्हांला वाटतं का की आपण आदर्शवादाच्या फारच आहारी गेलो आहोत? संस्कृती, परंपरा, धर्म वगैरेंच्या नावाखाली खोट्या समजुतींना घट्ट धरून बसलो आहोत? आम्हांला प्रत्येक पुरुष हा मर्यादापुरुषोत्तम राम आणि प्रत्येक स्त्री ही सीता असावी असं वाटतं. आम्हांला अगदी आदर्श नागरिक हवे असतात. लहानपणापासून प्रत्येकानेच कसं आदर्श असलं पाहिजे याचे पाठ पढवले जातात. घरी दारी शाळेत अगदी सगळीकडेच. कुणी एखादा चुकला कि राईचा पर्वत करून त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण केला जातो. मग लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच या खोट्या आदर्शवादाच्या भोवऱ्यात सापडून वाहत जातात. ते कधी वर येतच नाहीत. हा आदर्शवाद पिढ्यानपिढ्या तसाच पुढे पसरत जातो. आम्ही आमच्या महापुरुषांमध्येही देवाचा अंश शोधत बसतो. त्यामुळे त्यांचं माणूस असणंच नाकारतो आणि मग त्यांच्या चुकाही साहजिकच नाकारतो. किंबहुना त्यांना चुका करण्याची मुभाच देत नाही. पण माणसाला देव करण्यापेक्षा त्याला माणूस म्हणून त्याच्या चुकांसाहित स्वीकारायला आपला समाज कधी शिकणार? 'आमचा मुलगा आमच्या शब्दाबाहेर नाही' असं सांगताना कित्येक आई वडिलांची छाती अभिमानाने फुलून येते पण त्या मुलाच्या इच्छेचं काय? त्याच्या स्वप्नांचं काय? इथे मतभेद असण्याची शक्यताच मुळी नाकारली जाते. अशा सतत आदर्शांच्या दडपणात जागणाऱ्या समाजात कोण कसं सुखी होणार?
आम्हां घरी शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करुं ।। शब्दचि आमुच्या जीवांचे जीवन । शब्दें वाटू धन जनलोका ।। तुका म्हणे पहा शब्दचि हा देव। शब्दचि गौरव पूजा करुं ।।
बुधवार, ८ ऑक्टोबर, २०१४
शनिवार, ४ ऑक्टोबर, २०१४
हैदर
हैदर एक चांगली कलाकृती आहे. पण त्यामध्ये भारतीय सैन्याचं जे चित्रण केलंय ते मात्र धडधडीत खोटं आहे आणि फुटीरवाद्यांना सपोर्ट करणारं आहे. मला एक गोष्ट कळत नाही की बॉलीवूडवाले फुटीरवाद्यांच्या एवढं का प्रेमात पडलेत. इतकंच प्रेम उफाळून येत असेल तर पाकिस्तानात जाऊन चित्रपट बनवा आणि तिकडेच प्रदर्शित करा. हे म्हणजे भारताच्या तुकड्यांवर जगायचं आणि पाकचे गुणगान गायचे असं झालं. फक्त बॉलीवूडवालेच नाही तर अरुंधती रॉयसारखे तथाकथित पुरोगामीसुद्धा हाच सूर आळवतात. म्हणजे त्यांच्या आणि नवाझ शरीफ वगैरेंच्या विचारांत किती एकवाक्यता असते पहा. नवाझ शरीफ यांचं मागे संयुक्त राष्ट्रामध्ये जे भाषण झालं अगदी त्याचा प्रतिध्वनी वाटावा असा हैदर हा चित्रपट आहे. हे असं का हो ? ज्या भारतीय सैन्याने पुराच्या थैमनतुन काश्मिरींना वाचवलं, जे भारतीय सैन्य दिवस रात्र डोळ्यात तेल घालून यांचं आणि देशाचं रक्षण करतं त्याच सैन्याचं असं चित्रण करून काय साधायचंय यांना? कि काहीतरी वादग्रस्त केल्याशिवाय यांचं समाधान होतच नाही? हा सरळ सरळ देशद्रोह नाही तर काय आहे? अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे जे काय असेल ते असेल हो, पण अभिव्यक्तीच्या नावाखाली तुम्ही जो खोटेपणाच बोंबलून जगाला सांगता आणि फुटीरवाद्याचं जे गलिच्छ उदात्तीकरण करता त्याचं काय? Hamletवर चित्रपट बनवायला यांना काश्मीरची पार्श्वभूमी का घ्यावी लागते ते काळात नाही बुवा. यांचं फंडिंग अल कायदा किंवा तत्सम दहशतवादी संघटनांकडून होत असणार. अन्यथा कोणत्या देशातले लोक त्यांच्याच देशाचं असं demeaning portrait रंगवतात.
बुधवार, १ ऑक्टोबर, २०१४
स्थितप्रज्ञ
(आमच्या एका फोन संभाषणाचा हा सारांश)
आनंदाच्या हजार क्षणांपेक्षा दुःखाचा, उद्वेगाचा, वेदनेचा एक क्षण माणसाला स्थितप्रज्ञतेच्या जवळ घेऊन जातो. माणसानं स्थितप्रज्ञ असावं की नसावं हा कदाचित वादाचा मुद्दा असू शकतो, पण 'कठीण समय येता' स्थितप्रज्ञ वृत्ती कधीही चांगली असं माझं व्यक्तिगत मत आहे आणि तसा अनुभवसुद्धा आहे. 'पण त्यासाठी दुःख भोगलंच पाहिजे का' हाही युक्तिवाद अगदी मान्य. पण आयुष्यात नेहमीच सुख येत नाही हेही सत्य आहे. शेवटी काय तर 'समलोष्टाश्मकांचन' हे महत्त्वाचं.
गुरुवार, २५ सप्टेंबर, २०१४
एक टोक आहे ते म्हणजे मनात येईल ते करायचं , कसलाही विचार न करता बेधडक उडी मारायची, हवी ती स्वप्नं पाहायची आणि त्यांचा पाठलाग करायचा. दुसरं टोक आहे ते म्हणजे आपल्या मर्यादा ओळखून स्वप्नं पहायची, किंबहुना स्वप्नांना सुद्धा कुंपण घालून ठेवायचं, आपण काय करू शकतो आणि काय नाही ते साधा प्रयत्नसुद्धा न करताच ठरवून टाकायचं, काही गृहितकं मनात घेउनच आपली वाट चालायची. आणि आपण बहुतेक वेळा या दोन टोकांच्या मध्यावर लटकत राहतो आणि आपलं जीवनसुद्धा तसंच लटकत राहतं. स्वप्नं तर मोठी पाहतो पण त्यांचा पाठलाग करायची हिंमत आपल्यात नसते. अनोळखी प्रदेशात पाऊल ठेवायलासुद्धा घाबरतो आपण. आपल्याला थ्रिल हवं असतं पण सुरक्षेचं कवच पांघरूनच. कसलं विरोधाभासी वास्तव आहे, नाही का?
मंगळवार, १६ सप्टेंबर, २०१४
युद्ध...स्वतःशी
आपल्यापैकी प्रत्येक जण रोजच युद्ध लढतो आहे… स्वतःशी, परिस्थितीशी… कधी विजय होतो तर कधी पराजय … या युद्धात नेहमीच जिंकणं अपेक्षित नाही…पण दोन्हीही स्वीकारायला शिकणं महत्त्वाचं आहे … किंबहुना जय पराजय यांच्याही पलीकडे जाऊन रणांगणात टिकून राहणं महत्त्वाचं आहे… अगदी समोर पराभव दिसत असला तरीही… आजचा पराभव विसरून उद्याच्या लढाईची तयारी करणं हाच खरा पुरुषार्थ
रविवार, १४ सप्टेंबर, २०१४
शनिवार, १३ सप्टेंबर, २०१४
व्यक्ताव्यक्त
व्यक्त होणं, व्हावसं वाटणं ही माणसाची गरज आहे. आपली सुख दुःखं, आपल्या व्यथा, आपल्या चिंता, आपल्या अचिव्हमेंट्स इतरांसोबत शेअर करावसं वाटणं स्वाभाविक आहे. पण मनातलं सगळंच कुठं व्यक्त करता येतं. काही गोष्टी शब्दांअभावी मनातच राहतात तर काही शब्द गवसूनसुद्धा बाहेर पडत नाहीत. माणसानं आपलं मन रितं केलं पाहिजे असं कुणी कितीही म्हटलं तरीही ते शक्य आहे का? खरं तर व्यक्त न करता येण्यासारख्या कित्येक गोष्टींनी मन भरून गेलेलं असतं. आणि ते रितं करू म्हटल्याने काही रितं होत नाही. मुख्य म्हणजे कुणाकडे व्यक्त व्हायचं ? हे जग, आपल्या अवती भवतीची माणसं किती उथळ आहेत हे पाहिल्यावर तर मनातल्या गोष्टी मनातच राहिलेल्या बऱ्या असं वाटतं. इतरांनी आपल्याला समजून घेतल्यवर मिळणाऱ्या सुखापेक्षा त्यांनी गैरसमज करून घेतल्यावर वाटणारं दुःख भयंकर असतं.
शनिवार, ३० ऑगस्ट, २०१४
सुविचार
शाळेत असताना बोर्डावर सुविचार लिहायची जबाबदारी बहुतेक वेळा माझी असायची. तेव्हा फक्त ते सुविचार लिहायचो, त्यांचा अर्थ कळायचा पण त्यांचं महत्त्व नाही कळायचं कारण तेवढं जगच पाहिलं नव्हतं, तेवढा अनुभव गाठीशी नव्हता. पण आता थोडंफार जग पाहिलंय आणि थोडाफार अनुभव गाठीशी आहे तेव्हा काही सुविचारांचा अर्थ खऱ्या अर्थाने उलगडत आहे. खरं तर सुविचार म्हणजे कुणाचे ना कुणाचे अनुभवच नाही का? शब्दांत गोठलेले,थिजलेले . जोपर्यंत अनुभवाची झळ तुम्हांला लागत नाही तोपर्यंत ते तुमच्यासाठी फक्त थिजलेलेच राहणार.
सोमवार, १८ ऑगस्ट, २०१४
हिंदू
सगळी माणसं सारखीच आहेत यात काही वादच नाही , पण हे हिंदूंसोबतच इतरांनीही शिकायला हवंच. विशेषतः ज्यांना आपलाच धर्म श्रेष्ठ आणि एकमेव सत्य वाटतो त्यांनी. आणि राहता राहिला प्रश्न हिंदू या शब्दाचा. तर त्याचं मूळ काहीही असलं तरी आता हिंदू ही आपली ओळख झाली आहे. हिंदू शब्द नसता तरीही या धर्माला इतर कुठल्या तरी नावाने ओळखले गेले असतेच. आणि हिंदू नावाखाली जर वेगवेगळे भारतीय संप्रदाय एकवटले नसते तर आज त्यांचेच कित्येक धर्म झाले असते. कुणी शैव, कुणी वैष्णव, कुणी आणखी काही. मुळात "एकम सात विप्राः बहुधा वदन्ति" हीच हिंदू धर्माची विचारसारणी राहिलेली आहे नेहमीच. तुम्ही कोणा एका देवाला भजता किंवा कोण्या एका प्रेषिताला मानता म्हणून तुम्ही हिंदू अशी हिंदू धर्माची ओळख नाही हाच हिंदू धर्माचा मोठेपणा नाही का वाटत? मी हिंदू असूनसुद्धा नास्तिक असू शकतो ही हिंदू असण्यातली चैन नाही का? Authoritarian नसणं हे हिंदू धर्माचं बलस्थान नाही का वाटत? द्वैत अद्वैत, विशिष्ठाद्वैत यांच्यासोबत चार्वाकनीतीलाही फक्त हिंदू धर्मातच स्थान मिळू शकतं. मला वाटतं हिंदू धर्मात जर काही वाईट असेल तर ते एकच - जातीभेद.
गुरुवार, ७ ऑगस्ट, २०१४
१४ जून २०१३
(माझ्या ब्लॉगवर काही अर्धवट पोस्ट्स आहेत. ही त्यांपैकीच एक. १४ जून २०१३ रोजी लिहिलेली. आता ती पूर्ण करण्याची शक्यता नाही कारण ते फिलिंग परत येणे शक्य नाही. म्हणून तशीच अर्धवट पोस्ट.)
बाहेर कसला मस्त मोसम आहे राव. आणि मी हे असलं काय बोअरिंग करत बसलोय. आणि इथे जाम कंटाळा आलाय राव labमध्ये बसून बसून. एक शोध निबंध (रिसर्च पेपर ) वाचूनच डोक्याचा पार खुळखुळा झालाय. आजचा विचारांचा कोटा संपलाय आणि आज तरी नवीन काही आयडिया उगवेलसं वाटत नाही. नुसती खिचडी झालीय डोक्यात. मी प्रॉब्लेमच्या जवळ असल्यसारखं वाटतंय. तसं आतापर्यंत ते बऱ्याच वेळा वाटलंय. असो. तर पाऊस… पावसाळ्यात एक खास मूड तयार होतो. अशा वेळी सगळं सोडून घरी असावं किंवा या पावसाचा मनमुराद आनंद घेत कुठेतरी निवांत ठिकाणी असावं… अगदी कुठेही चालेल पण इथे नको. मनसोक्त जगावंसं वाटतं. खूप काही लिहावंसंसुद्धा वाटतं. कविता सुचायला लागतात. आठवणी दाटायला लागतात. सगळंच मस्त मस्त वाटायला लागतं. "श्रावण मासी, हर्ष मानसी…' अशी अवस्था होते.
बाहेर कसला मस्त मोसम आहे राव. आणि मी हे असलं काय बोअरिंग करत बसलोय. आणि इथे जाम कंटाळा आलाय राव labमध्ये बसून बसून. एक शोध निबंध (रिसर्च पेपर ) वाचूनच डोक्याचा पार खुळखुळा झालाय. आजचा विचारांचा कोटा संपलाय आणि आज तरी नवीन काही आयडिया उगवेलसं वाटत नाही. नुसती खिचडी झालीय डोक्यात. मी प्रॉब्लेमच्या जवळ असल्यसारखं वाटतंय. तसं आतापर्यंत ते बऱ्याच वेळा वाटलंय. असो. तर पाऊस… पावसाळ्यात एक खास मूड तयार होतो. अशा वेळी सगळं सोडून घरी असावं किंवा या पावसाचा मनमुराद आनंद घेत कुठेतरी निवांत ठिकाणी असावं… अगदी कुठेही चालेल पण इथे नको. मनसोक्त जगावंसं वाटतं. खूप काही लिहावंसंसुद्धा वाटतं. कविता सुचायला लागतात. आठवणी दाटायला लागतात. सगळंच मस्त मस्त वाटायला लागतं. "श्रावण मासी, हर्ष मानसी…' अशी अवस्था होते.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)