आपल्याला जग जसं दिसतं, आपण जी सुखदुःखं अनुभवतो, ते सगळं अगदी जशाला तसं नसलं तरी निदान काही अंशी कुणाला तरी सांगावं , कुठं तरी व्यक्त व्हावं म्हणून शब्दांचा आधार. अनुभूतीला किती अंगं, किती कंगोरे! बदलत जाणाऱ्या, हिंदोळणाऱ्या मनाबरोबर बदलणारे दृष्टीकोण, बदलणारे संदर्भ, बदलणारे अर्थ, बदलणाऱ्या जाणीवा, आणि एकूणच बदलणारं जगच. स्थिर असं काय आहे? शाश्वत असं काय आहे? चिरंतन असं काय आहे? आलेला प्रत्येक क्षण भूतकाळाच्या अथांग सागराचं अंग होऊन जातो, आपल्याही नकळत. आपण "जुने जाऊद्या मरणालागुनी " म्हणत नव्याच्या स्वागतासाठी सज्ज होतो. पण खरंच जुनं ते मरणपंथाला जातं? आपल्यालाही जुनं ते सारंच सरणावर जावं असं कुठे वाटतं ? मला तरी तसं नाही वाटत. उलट जुनं ते सगळंच मस्त वाटतं. ते सुखदायक असो कि क्लेशदायक. असंच कधी कधी चित्रपट पाहिल्यासारखं आठवायचं. हवं तर फास्ट फॉरवर्ड करायचं, हवा तो भाग रिपीट मोडमध्ये प्ले करायचा. आहे कि नाही मस्त?
आम्हां घरी शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करुं ।। शब्दचि आमुच्या जीवांचे जीवन । शब्दें वाटू धन जनलोका ।। तुका म्हणे पहा शब्दचि हा देव। शब्दचि गौरव पूजा करुं ।।
शुक्रवार, १३ डिसेंबर, २०१३
गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१३
मंगळयान
आजकाल कुणीही कशावरही भाष्य करू लागलाय. पत्रकारांना तर जगाच्या पाठीवरच्या सगळ्याच गोष्टींवर आपापले विचार मांडायचा परवानाच मिळालेला असतो. आणि ते त्यांचा हा हक्क अगदी इमाने इतबारे बजावत असतात. आपल्याला एखाद्या विषयातली माहिती असो अथवा नसो त्याबद्दल आपले मत असले पाहिजे आणि ते ठामपणे मांडले पाहिजे असे त्यांना वाटत असते. आता लोकसत्तामधला हा आजचा अग्रलेखच पहा. अतिशय उथळपणे, पुरेसा विचार न करता लिहिलेला अग्रलेख म्हणता येईल. यांच्या म्हणण्यानुसार 'आपण पाठवलेली संशोधन उपकरणे केवळ २५ किलो वजनाची आहेत आणि त्यामुळे आपण मंगळावर काही फार संशोधन करणार नाही आहोत आणि ही मोहीम म्हणजे आपण आपल्या हिमतीवर मंगळ मोहीम आखू शकतो हे जगाला दाखवणे हा आहे. आणि मंगळयान हे मंगळापासून सुमारे ३६० किमी अंतरावर असेल म्हणजे मुंबईत बसून रत्नागिरीचा अभ्यास केल्यासारखं आहे'. तर माननीय महोदय उपकरणांच्या वजनावरून त्यांच्या क्षमतेचा अंदाज करायला आपण कुठे शिकलात? आणि आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो अंतराळ मोहिमेत ३६० किमी हे अंतर म्हणजे फार जास्त नसतं, आपले उपग्रह हजारो किमी अंतरावर असतात आणि तिथूनसुद्धा ते हाय क्वालिटी फोटोज घेऊ शकतात.
ब्रह्मपुत्रा होस्टेल IIT Madras...कॅमेऱ्यातून
गेली जवळपास दोन वर्षे मी जिथे राहतोय त्या आमच्या ब्रम्हपुत्रा होस्टेलचे हे काही फोटोज. मोबाईलच्या कॅमेऱ्यातून घेतल्याने फोटो क्वालिटी तितकीशी चांगली नाही. तरीही a picture is worth more than thousand words...! म्हणून हा प्रपंच. तसं आमचं होस्टेल म्हणजे अगदी हिरवाईने नटलेलं आहे हे पहालच तुम्ही.
एका सायंकाळी होस्टेलच्या गच्चीवरून घेतलेला हा फोटो
माझ्या रूममधून दिसणारा होस्टेलचा परिसर
वृक्षवल्ली आम्हां सोयरे…
आणि ही वनचरे सुद्धा…
हे badminton court …
… आणि ही माझी रूम.
एक झाड वठलेलं…
माझ्या रूमच्या galleryमधून दिसणारं दृश्य
galleryतून आत येणारं सकाळचं उन…
हा सुद्धा galleryमधून घेतलेला एक फोटो…
रात्र उतरल्यावर
होस्टेलवर हळुवार उतरणारं चांदणं…
आणि हा इथे मी …
बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१३
पैलतीर
मागच्या मे महिन्यात घरी गेलो होतो, दर वेळी जातो तसाच. एके दिवशी सकाळी लवकर उठलो (जे आता फार क्वचित घडतं) आणि मग जाणवलं की इथे सगळं काही तसंच पूर्वीसारखं आहे. आई, अण्णा, बहिणाबाई सगळेच सकाळी सहाच्या आधी उठतात. सात वाजेपर्यंत सगळ्यांचं अंघोळ करून झालेलं असतं. सगळ्या खोल्या झाडून स्वछ झालेल्या असतात. आई अजून रोज अंगणात सडा टाकते, रांगोळी काढते, तुळशीची पूजा करते. हे तुळशीवृंदावनसुद्धा अगदी तेच आहे. अण्णा सकाळी सकाळी काळ्या कमानीकडे जाऊन भाजीपाला आणतात. पेपरवाला भल्या सकाळी येउन पेपर टाकून जातो. दहीवल्या मावशी अजून रोज सकाळी न चुकता दही घ्यायचं का म्हणून विचारतात. सगळ्याच अंगणांत साडे शिंपण चाललेलं असतं. शाळेत जाणाऱ्या मुलांची तशीच धावपळ चाललेली असते जशी माझी असायची. मीही असाच होतो काही वर्षांपूर्वी, शाळेत असताना. हे सगळं किती मस्त आहे. मला माझे शाळेचे दिवस आठवले. किती उत्साह होता जगण्यात तेव्हा. सकाळी सात वाजता शाळा भरायची आणि आम्ही साडेसहालाच घरातून निघायचो. (सकाळचे सहा वाजल्याचं घड्याळात पाहून आता युगं उलटली असं वाटतंय. ) मग दहावीचं वर्ष. दिवसभर शाळा, एक्स्ट्रा क्लासेस यात किती बिझी असायचो तरीही तरतरीत. हा वसमत रोड रोज सकाळी सकाळी किती प्रफुल्लीत वाटतो अजूनही. पण आता मला या सगळ्यापासून खूप दूर आल्यासारखं वाटतंय. स्वतःच्याच प्रश्नांमध्ये इतका गुरफटत गेलो कि या गोष्टींकडे लक्षच राहिलं नाही. आपल्या प्रश्नांच्या पलीकडेसुद्धा जग आहे आणि ते खूप सुंदर आहे हे भानच राहिलं नाही. पण हे लवकर लक्षात आलं हेही नसे थोडके.
शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१३
खरं सांगायचं तर
(पांडुरंग सांगवीकरच्या भाषेत सांगायचं तर हे म्हणजे अगदी सहज वगैरे लिहिलं. माणसानं कसं स्वतःशी प्रामाणिक वगैरे असावं म्हणून. नाकर्तेपणा जिंदाबाद ...! )
माझे बी. टेक.चे दिवस म्हणजे काही लय भारी वगैरे नव्हते. म्हणजे ते कॉलेज डेज वगैरे असं काही मी मुळीच मिस करत नाही. नाही म्हणायला काही आठवणी आहेत, पण 'जाने काहां गए वो दिन' असलं फिल्मी मुळीच नाही हं. खरं तर फायनल इयरला असताना जाम कंटाळा आला होता कॉलेजचा. कधी एकदा इथून बाहेर पडतो असं झालं होतं. उगाच खोटं कशाला सांगा? काही लोक उगाच मसाला लाऊन लाऊन आपल्या कॉलेजच्या दिवसांचं वर्णन करत असतात जणू काही ते त्या कॉलेजचे हिरोच होते. खरं सांगायचं म्हणजे कॉलेजच्या दिवसांत मी एकदम सुस्त प्राणी होतो. चार वर्षांत काही म्हणजे काहीच केलं नाही. फक्त पास होण्यापुरता अभ्यास तेही पर्याय नव्हता म्हणून करावा लागला. आणि निव्वळच पर्याय नव्हता असंही काही नाही. कधी कधी अभ्यासात मजासुद्धा यायची. कधी कधी आपण हे म्हणजे लय भारी शिकतो आहोत असं वाटून एकदम उत्साहाची भारती यायची. पण ती लगेच ओसरुनही जायची. आणि इंजिनिअरिंगची इतर मुले करतात तसं मी मुळीच क्लेम करत नाही कि परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करून मी पास झालो. गरजेपुरता अभ्यास करायचो. उगाच स्वतःला हुशार म्हणून प्रोजेक्ट कशाला करा?
तर सांगायचं म्हणजे नाईलाज म्हणून केलेला अभ्यास सोडला तर आमचे बीटेकचे दिवस म्हणजे एकदम कोरेच. कुठल्या कल्चरल प्रोग्राममध्ये, कुठल्या स्पोर्टमध्ये कशातच भाग घेतला नाही. बरं अभ्यासात लय भारी होतो असंही नव्हतं. दिवसभर क्लासेस झाले कि रूमवर येउन गप्पा मारत बसायचं किंवा मग युनिवर्सिटीकडे फेरफटका मारायचा नाहीतर काळेश्वरला जायचं हा एकच उद्योग होता आमचा. हो म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये माझ्यासारखीच काहीही न करणारी बरीच मित्रमंडळी होती. म्हणजे एकंदरच काय तर कॉलेजात आम्ही एकदम मिडल क्लास विद्यार्थी होतो. पण हे सगळं ठरवून वगैरे नव्हतं, सर्वांना वाटतं तसंच 'आपण काहीतरी वेगळं करावं' असं वाटायचं पण नेमकं काय करावं हेच कळायचं नाही. सीव्हीमध्ये लिहायला म्हणून थर्ड इयरला असताना एक इव्हेंट तेवढा ऑर्गनाईझ केला होता. तेच काय ते वेगळं. अजून एक वेगळी गोष्ट म्हणजे थर्ड इयरला असतानाच एका मुलीला प्रोपोज केलं होतं पण तिकडून नकार आला आणि तो प्रयत्न सपशेल फसला.
आणि उगाच गैरसमज व्हायला नको म्हणून सांगतो कि मी आमचं काहीही न करणं ग्लोरिफाय वगैरे करत नाही बरं का. पण त्याची काही खंतसुद्धा नाही. उलट त्या दिवसांकडे मी आता त्रयस्थपणे पाहतो. पण त्रयस्थपणे म्हणजे रुक्षपणे नव्हे. काही मजेदार, काही गमतीशीर, काही हळव्या(?) आठवणीही आहेत. त्यांबद्दल नंतर कधीतरी...
शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१३
संहिता (The Script)
या चित्रपटात "माणूस स्वतःची संहिता स्वतः कधी लिहू शकेल?" असा एक डायलॉग आहे. मी तो ट्रेलरमध्ये पहिला आणि मग थोड्या वेळाने क्लिक झालं कि 'अरे हो, यावर आपण कधी विचारच केला नाही'. आपलं आयुष्य आपल्या मनासारखं जगावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. काही जणांना ते शक्य होतं आणि काही जणांना त्यासाठी झगडावं लागतं आणि काही जण आपण जसे जगतो आहोत तसंच आपल्याला जगायचं होतं असं म्हणून स्वतःची समजूत काढतात. पण आपल्या आयुष्याची संहिता आपण लिहिणं हे सोपं नसतंच. त्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागतो. कारण आपल्या संहितेत ज्यांवर आपला कंट्रोल नाही अशा गोष्टी पण येतातच आणि त्या आपापल्या परीने संहितेवर परिणाम करत असतात.
संहिता
सुमित्रा भावे आणि सुनील सुकठनकर (नाव बरोबर आहे ना ? कारण इंग्रजी Sukthankarवरून इथे ट्रान्सलेट केलंय) या दिग्दर्शक द्वयीने आतापर्यंत दहा (?) चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यांच्या कलाकृतींना आतापर्यंत बरेच अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे चित्रपट बऱ्याच आंतरराष्ट्रीय चित्रपट सोहळ्यांमध्ये प्रदर्शित केले गेले आहेत. हे सगळं लिहिण्याचं कारण म्हणजे त्यांचा संहिता हा चित्रपट काल ४ ऑक्टोबर २०१३ रोजी प्रदर्शित झाला. मी अजून पहिला नाही पण एकंदर त्यांच्या चित्रपटांचे विषय पाहता संहिताबद्दल एक उत्सुकता लागलेली आहे. या द्वायीचे देवराई, नितळ, दहावी फ हे चित्रपट मी पहिले आहेत. त्यांचे चित्रपट हे अगदी वास्तवदर्शी आणि वेगवेगळ्या गंभीर विषयांवर असतात. निव्वळ मनोरंजनासाठी म्हणाल तर निराशा होईल पण वेगळ्या विषयावरचा चित्रपट पहायचा असेल तर या द्वायीचे चित्रपट पाहणं एक चांगला अनुभव असू शकतो. संहिता चित्रपटाची झलक इथे क्लिक करून पाहू शकता.
गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१३
दुनियादारी: कादंबरी आणि चित्रपट
काल दुनियादारी चित्रपट पहिला. आणि साधारणपणे दोन महिन्यांपूर्वी जेव्हा दुनियादारी रिलीज झाला होता तेव्हाच दुनियादारी ही कादंबरी वाचली. चित्रपट आणि कादंबरी दोन्हीही अप्रतिम आहेत. चित्रपटासाठी मूळ कथेत काही मुलभूत बदल केले आहेत पण ते कुठेच अनाठायी वाटत नाहीत. उलट चित्रपट हिट होण्याचं बरचसं श्रेय त्या बदलांनाच द्यावं लागेल.
कादंबरी सुरु होते ती श्रेयस पुण्यात आल्यावर आणि मग श्रेयसभोवती फिरते. चित्रपट सुरु होतो म्हातारे शिरीन आणि प्रितम श्रेयसला भेटायला म्हणून पुण्याला जायला निघतात तेव्हा. खरं तर कादंबरीमध्ये श्रेयस किंवा कुणीच म्हातारं होत नाही म्हणजे त्याआधीच कादंबरी संपते. कादंबरीमध्ये गुजराती असलेली शिरीन आणि प्रितम पटेल ही भावंडं चित्रपटात चक्क शिरीन आणि प्रितम घाटगे अशी मराठी होतात आणि त्यांची पार्श्वभूमी सुद्धा राजकीय दाखवली आहे. त्यांचे वडील राजकारणात असल्याचं दाखवलंय. कादंबरीत एक साधा मवाली असलेल्या साईलासुद्धा चित्रपटात राजकीय पार्श्वभूमी मिळते आणि त्याच्यातला विलन अजून पॉवरफुल होतो. या दोन्ही बदलांना पुढे मोठ्या खुबीने एकमेकांत गुंफलंय. जेव्हा साई आणि शिरीन यांचं लग्न ठरल्याचं कळतं तेव्हा धक्का बसल्याशिवाय राहत नाही. म्हणजे शिरीन आणि प्रितम ही भावंडं कट्टा gangचे फ्रेंड्स आणि त्या शिरीनचं लग्न कट्टा gangचा जानी दुश्मन असलेल्या साईशी? पण हा बदल जमून गेलाय. कादंबरीत श्रेयस मिनुच्या प्रेमात आपण होऊन पडतो. पण चित्रपटात तो नाटक करत असल्याचं चित्रण आहे हे जरा खटकतं. असो. नंतर सगळ्यात मोठा बदल म्हणजे चित्रपटात चक्क श्रेयस आणि शिरीनचं लग्न होतं. कादंबरीत असलं काहीही होत नाही,सगळे आपापल्या मार्गाने निघून जातात. चित्रपटात एम. के.ला जास्त महत्त्व नाही दिलं आणि ते एका दृष्टीने बरंच झालं कारण कादंबरीतही जेव्हा एम.के. आणि श्रेयस यांचा संवाद येतो तेव्हा कादंबरीचा पेस मंदावल्यासारखा वाटतो. पण कादंबरीत दारू ढोसून मारणाऱ्या एम के ने चित्रपटात आत्महत्या का केली हे कळत नाही. आणि चित्रपटाचा शेवट तर अगदी यू टर्नच आहे- शेवटी श्रेयस मरतो. पण हा एंड सुद्धा जमून गेलाय. कारण चित्रपट संपल्यावर काहीतरी हरवल्यासारखं वाटत राहतं.
सर्वांचाच अभिनय अगदी अप्रतिम आहे. दिघ्याच्या रोलमध्ये अंकुश चौधरी अगदी परफेक्ट बसतो, स्वप्नीलने साकारलेला श्रेयस, शिरीन झालेली सई, उर्मिला कानेटकरने साकारलेली निरागस मिनू, जितू जोशीचा साई सगळे आपापल्या भूमिकांमध्ये योग्य वाटतात.
शनिवार, २१ सप्टेंबर, २०१३
तो जायचा दिवस...
घरी असलं कि दिवस इतके लवकर निघून जातात कि घरी राहिल्यासारखं वाटतच नाही. अचानक तो जायचा दिवस समोर येउन उभा राहतो. त्याच्या आदल्या दिवशी तर एकेक क्षण हातातून निसटत असल्यासारखं वाटतं, काय करू अन काय नको असं होतं. मी ते क्षण धरून ठेवण्याचा निष्फळ प्रयत्न करतो पण ते शेवटी निसटून जातातच आणि मग उदास रात्र पसरते साऱ्या जगावर आणि माझ्या मनातही. आणि इच्छा नसतानाही सामानाची बांधाबांध करावी लागते कारण दुसऱ्या दिवशी सकाळीच निघायचं असतं. पुन्हा कमीत कमी सहा महिने तरी हे घरी राहण्याचं सुख मिळणार नसतं. झोपही काही केल्या डोळ्यात उतरायला तयार नसते. मग मी या दिवसांत काय काय केलं, कुणाकुणाला भेटलो, कुठेकुठे गेलो याचं पुनरावलोकन होतं. काही गोष्टी केल्याचं समाधान असतं तर काही राहून गेल्याची खंत. आणि मग या विचारांच्या तंद्रीत केव्हा तरी अलगद झोपेच्या स्वाधीन होतो…आणि सकाळ होते. मग मोठ्या मुश्किलीने उठावंच लागतं. आई साखरझोपेत असलेल्या बहिणाबाईला मी जाणार म्हणून उठवते. आपल्यामुळे एवढ्या सगळ्यांना झोपेतून उठावं लागतंय याचं वाईट वाटतं, पण पर्याय नसतो. आई तर पहाटेपासूनच उठलेली असते. सगळी आवराआवर करून शेवटी देव्हाऱ्यातल्या देवाला, आई-अण्णाला नमस्कार करून स्वारी निघते रेल्वे स्टेशनकडे. इतक्या दिवसांत पहिल्यांदाच इतक्या सकाळी उठल्यामुळे परभणीचं सकाळचं दुर्मिळ रूप नजरेस पडतं आणि परभणी अशीही असते हे पाहून आनंद वाटतो. बाहेर थंडगार हवा सुटलेली असते, वसमत रोड अजून काहीसा पेंगतच असतो, वाहनांची गर्दी व्हायला अजून अवकाश असतो आणि नाही म्हणायला जॉगिंगवाल्यांची वर्दळ असते, खानापूर फाट्याजवळच्या कृष्ण मंदिरातल्या कृष्णाला मी दुरूनच नमस्कार करतो, काळ्या कमानीला अन गुलमोहर हॉटेललासुद्धा अजून जाग आलेली नसते, त्यापुढे पेट्रोल पंप अन शिवाजी कॉलेजसमोरचे कॉम्प्लेक्स निपचित असतात आणि त्यासमोर अजून झोपेतच असलेलं गार्डन दिसतं, मग अजून पुढे शिवाजी पुतळा आणि बी. रघुनाथ सभागृह शांतपणे उभे असलेले दिसतात आणि रेल्वे स्टेशन आल्याची चाहूल लागते. हे सगळं मी डोळ्यांत साठवून ठेवत असतो आणि पुढच्या खेपेला रोज सकाळी लवकर उठून हे सगळं अनुभवायचा निश्चय करून टाकतो.
असंच आयुष्याचंसुद्धा असावं. आयुष्याच्या संध्याकाळी किती विचार येत असतील मनात, नाही का? तिथे तर काहीच बरोबर येणार नसतं, आठवणीसुद्धा नाही आणि परत यायचीसुद्धा सोय नसते. ते जाणं कायमचंच असतं. इतके दिवस ज्यांच्या सहवासात घालवले ती माणसे; जिथे राहिलो, जगलो ते घर, तो परिसर; हे जग; अगदी सगळंच काही सोडून जावं लागणं ही कल्पनाच किती भयंकर आहे.
बुधवार, ४ सप्टेंबर, २०१३
भयंकर डिप्रेशन
आज आपल्याला भयंकर डिप्रेशन आलंय. त्यामुळे काहीतरी भारी असं आपल्या हातून लिहिलं जाण्याची लई दाट शक्यता आहे. त्यासाठी डोक्यातली झाडून सगळी अक्कल पणाला लावली आहे. पण अजून लई भारी असं काही उगवलं नाही. पण हे चांगलं आहे. जेवढं उशिरा उगवेल तेवढं ते भारी असेल असं आम्हांला वाटतंय. रूममधली ट्यूब वगैरे बंद करून अंधार केला आहे, एकदम जुनी जुनी मराठी गाणी मंद आवाजात लावली आहेत. म्हणजे एकूणच सुपीक वातावरण तैय्यार है. फक्त एखादी भन्नाट आयडिया उगवायला उशीर कि टिपलीच म्हणून समजा.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)























