पृष्ठे

शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१३

खरं सांगायचं तर

(पांडुरंग सांगवीकरच्या भाषेत सांगायचं तर हे म्हणजे अगदी सहज वगैरे  लिहिलं. माणसानं कसं स्वतःशी प्रामाणिक वगैरे असावं म्हणून.  नाकर्तेपणा जिंदाबाद ...! )

माझे बी. टेक.चे दिवस म्हणजे काही लय भारी वगैरे नव्हते. म्हणजे ते कॉलेज डेज वगैरे असं काही मी मुळीच मिस करत नाही. नाही म्हणायला काही आठवणी आहेत,  पण 'जाने काहां गए वो दिन' असलं फिल्मी मुळीच नाही हं. खरं तर फायनल इयरला असताना जाम कंटाळा आला होता कॉलेजचा. कधी एकदा इथून बाहेर पडतो असं झालं होतं. उगाच खोटं कशाला सांगा? काही लोक उगाच मसाला लाऊन लाऊन आपल्या कॉलेजच्या दिवसांचं वर्णन करत असतात जणू काही ते त्या कॉलेजचे हिरोच होते. खरं सांगायचं म्हणजे कॉलेजच्या दिवसांत मी एकदम सुस्त प्राणी होतो. चार वर्षांत काही म्हणजे काहीच केलं नाही. फक्त पास होण्यापुरता अभ्यास तेही पर्याय नव्हता म्हणून करावा लागला. आणि निव्वळच पर्याय नव्हता असंही काही नाही. कधी कधी अभ्यासात मजासुद्धा यायची. कधी कधी आपण हे म्हणजे लय भारी शिकतो आहोत असं वाटून एकदम उत्साहाची भारती यायची. पण ती लगेच ओसरुनही जायची.  आणि इंजिनिअरिंगची इतर मुले करतात तसं मी मुळीच क्लेम करत नाही कि परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करून मी पास झालो. गरजेपुरता अभ्यास करायचो. उगाच स्वतःला हुशार म्हणून प्रोजेक्ट कशाला करा? 

तर सांगायचं म्हणजे नाईलाज म्हणून केलेला अभ्यास सोडला तर आमचे बीटेकचे दिवस म्हणजे एकदम कोरेच. कुठल्या कल्चरल प्रोग्राममध्ये, कुठल्या स्पोर्टमध्ये कशातच भाग घेतला नाही. बरं अभ्यासात लय भारी होतो असंही नव्हतं. दिवसभर क्लासेस झाले कि रूमवर येउन गप्पा मारत बसायचं किंवा मग युनिवर्सिटीकडे फेरफटका मारायचा नाहीतर काळेश्वरला जायचं हा एकच उद्योग होता आमचा. हो म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये माझ्यासारखीच काहीही न करणारी बरीच मित्रमंडळी होती. म्हणजे एकंदरच काय तर कॉलेजात आम्ही एकदम मिडल क्लास विद्यार्थी होतो. पण हे सगळं ठरवून वगैरे नव्हतं, सर्वांना वाटतं तसंच 'आपण काहीतरी वेगळं करावं' असं वाटायचं पण नेमकं काय करावं हेच कळायचं नाही. सीव्हीमध्ये लिहायला म्हणून थर्ड इयरला असताना एक इव्हेंट तेवढा ऑर्गनाईझ केला होता. तेच काय ते वेगळं. अजून एक वेगळी गोष्ट म्हणजे थर्ड इयरला असतानाच एका मुलीला प्रोपोज केलं होतं पण तिकडून नकार आला आणि तो प्रयत्न सपशेल फसला. 

आणि उगाच गैरसमज व्हायला नको म्हणून सांगतो कि मी आमचं काहीही न करणं ग्लोरिफाय वगैरे करत नाही बरं का. पण त्याची काही खंतसुद्धा नाही. उलट त्या दिवसांकडे मी आता त्रयस्थपणे पाहतो. पण त्रयस्थपणे म्हणजे रुक्षपणे नव्हे. काही मजेदार, काही गमतीशीर, काही हळव्या(?) आठवणीही आहेत. त्यांबद्दल नंतर कधीतरी...

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१३

संहिता (The Script)


या चित्रपटात "माणूस स्वतःची संहिता स्वतः कधी लिहू शकेल?" असा एक डायलॉग आहे. मी तो ट्रेलरमध्ये पहिला आणि मग थोड्या वेळाने क्लिक झालं कि 'अरे हो, यावर आपण कधी विचारच केला नाही'. आपलं आयुष्य आपल्या मनासारखं जगावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. काही जणांना ते शक्य होतं आणि काही जणांना त्यासाठी झगडावं लागतं आणि काही जण आपण जसे जगतो आहोत तसंच आपल्याला जगायचं होतं असं म्हणून स्वतःची समजूत काढतात. पण आपल्या आयुष्याची संहिता आपण लिहिणं हे सोपं नसतंच. त्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागतो. कारण आपल्या संहितेत ज्यांवर आपला कंट्रोल नाही अशा गोष्टी पण येतातच आणि त्या आपापल्या परीने संहितेवर परिणाम करत असतात. 

संहिता




सुमित्रा भावे आणि सुनील सुकठनकर (नाव बरोबर आहे ना ? कारण इंग्रजी Sukthankarवरून इथे ट्रान्सलेट केलंय) या दिग्दर्शक द्वयीने आतापर्यंत दहा (?) चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यांच्या कलाकृतींना आतापर्यंत बरेच अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे चित्रपट बऱ्याच आंतरराष्ट्रीय चित्रपट सोहळ्यांमध्ये प्रदर्शित केले गेले आहेत. हे सगळं लिहिण्याचं कारण म्हणजे त्यांचा संहिता हा चित्रपट काल ४ ऑक्टोबर २०१३ रोजी प्रदर्शित झाला. मी अजून पहिला नाही पण एकंदर त्यांच्या चित्रपटांचे विषय पाहता संहिताबद्दल एक उत्सुकता लागलेली आहे. या द्वायीचे देवराई, नितळ, दहावी फ हे चित्रपट मी पहिले आहेत. त्यांचे चित्रपट हे अगदी वास्तवदर्शी आणि वेगवेगळ्या गंभीर विषयांवर असतात. निव्वळ मनोरंजनासाठी म्हणाल तर निराशा होईल पण वेगळ्या विषयावरचा चित्रपट पहायचा असेल तर या द्वायीचे चित्रपट पाहणं एक चांगला अनुभव असू शकतो. संहिता चित्रपटाची झलक   इथे क्लिक करून पाहू शकता. 


गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१३

दुनियादारी: कादंबरी आणि चित्रपट

काल दुनियादारी चित्रपट पहिला. आणि साधारणपणे दोन महिन्यांपूर्वी जेव्हा दुनियादारी रिलीज झाला होता तेव्हाच दुनियादारी ही कादंबरी वाचली. चित्रपट आणि कादंबरी दोन्हीही अप्रतिम आहेत. चित्रपटासाठी मूळ कथेत काही मुलभूत बदल केले आहेत पण ते कुठेच अनाठायी वाटत नाहीत. उलट चित्रपट हिट होण्याचं बरचसं श्रेय त्या बदलांनाच द्यावं लागेल. 

कादंबरी सुरु होते ती श्रेयस पुण्यात आल्यावर आणि मग श्रेयसभोवती फिरते. चित्रपट सुरु होतो म्हातारे शिरीन आणि प्रितम श्रेयसला भेटायला म्हणून पुण्याला जायला निघतात तेव्हा. खरं तर कादंबरीमध्ये श्रेयस किंवा कुणीच म्हातारं होत नाही म्हणजे त्याआधीच कादंबरी संपते. कादंबरीमध्ये गुजराती असलेली शिरीन आणि प्रितम पटेल ही भावंडं चित्रपटात चक्क शिरीन आणि प्रितम घाटगे अशी मराठी होतात आणि त्यांची पार्श्वभूमी सुद्धा राजकीय दाखवली आहे. त्यांचे वडील राजकारणात असल्याचं दाखवलंय. कादंबरीत एक साधा मवाली असलेल्या साईलासुद्धा चित्रपटात राजकीय पार्श्वभूमी मिळते आणि त्याच्यातला विलन अजून पॉवरफुल होतो. या दोन्ही बदलांना पुढे मोठ्या खुबीने एकमेकांत गुंफलंय.  जेव्हा साई आणि शिरीन यांचं लग्न ठरल्याचं कळतं तेव्हा धक्का बसल्याशिवाय राहत नाही. म्हणजे शिरीन आणि प्रितम ही भावंडं कट्टा gangचे फ्रेंड्स आणि त्या शिरीनचं लग्न कट्टा gangचा जानी दुश्मन असलेल्या साईशी? पण हा बदल जमून गेलाय. कादंबरीत श्रेयस मिनुच्या प्रेमात आपण होऊन पडतो. पण चित्रपटात तो नाटक करत असल्याचं चित्रण आहे हे जरा खटकतं. असो. नंतर सगळ्यात मोठा बदल म्हणजे चित्रपटात चक्क श्रेयस आणि शिरीनचं लग्न होतं. कादंबरीत असलं काहीही होत नाही,सगळे आपापल्या मार्गाने निघून जातात. चित्रपटात एम. के.ला जास्त महत्त्व नाही दिलं आणि ते एका दृष्टीने बरंच झालं कारण कादंबरीतही जेव्हा एम.के. आणि श्रेयस यांचा संवाद येतो तेव्हा कादंबरीचा पेस मंदावल्यासारखा वाटतो.  पण कादंबरीत दारू ढोसून मारणाऱ्या एम के ने चित्रपटात आत्महत्या का केली हे कळत नाही. आणि चित्रपटाचा शेवट तर अगदी यू टर्नच आहे- शेवटी श्रेयस मरतो. पण हा एंड सुद्धा जमून गेलाय. कारण चित्रपट संपल्यावर काहीतरी हरवल्यासारखं वाटत राहतं. 

सर्वांचाच अभिनय अगदी अप्रतिम आहे. दिघ्याच्या रोलमध्ये अंकुश चौधरी अगदी परफेक्ट बसतो, स्वप्नीलने साकारलेला श्रेयस, शिरीन झालेली सई, उर्मिला कानेटकरने साकारलेली निरागस मिनू, जितू जोशीचा साई सगळे आपापल्या भूमिकांमध्ये योग्य वाटतात. 

शनिवार, २१ सप्टेंबर, २०१३

तो जायचा दिवस...

घरी असलं कि दिवस इतके लवकर निघून जातात कि घरी राहिल्यासारखं वाटतच नाही. अचानक तो जायचा दिवस समोर येउन उभा राहतो. त्याच्या आदल्या दिवशी तर एकेक क्षण हातातून निसटत असल्यासारखं वाटतं, काय करू अन काय नको असं होतं. मी ते क्षण धरून ठेवण्याचा निष्फळ प्रयत्न करतो पण ते शेवटी निसटून जातातच आणि मग उदास रात्र पसरते साऱ्या जगावर आणि माझ्या मनातही. आणि इच्छा नसतानाही सामानाची बांधाबांध करावी लागते कारण दुसऱ्या दिवशी सकाळीच निघायचं असतं. पुन्हा कमीत कमी सहा महिने तरी हे घरी राहण्याचं सुख मिळणार नसतं. झोपही काही केल्या डोळ्यात उतरायला तयार नसते. मग मी या दिवसांत काय काय केलं, कुणाकुणाला भेटलो, कुठेकुठे गेलो याचं पुनरावलोकन होतं. काही गोष्टी केल्याचं समाधान असतं तर काही राहून गेल्याची खंत. आणि मग या विचारांच्या तंद्रीत केव्हा तरी अलगद झोपेच्या स्वाधीन होतो…आणि सकाळ होते. मग मोठ्या मुश्किलीने उठावंच लागतं. आई साखरझोपेत असलेल्या बहिणाबाईला मी जाणार म्हणून उठवते. आपल्यामुळे एवढ्या सगळ्यांना झोपेतून उठावं लागतंय याचं वाईट वाटतं, पण पर्याय नसतो. आई तर पहाटेपासूनच  उठलेली असते. सगळी आवराआवर करून शेवटी देव्हाऱ्यातल्या देवाला, आई-अण्णाला नमस्कार करून स्वारी निघते रेल्वे स्टेशनकडे. इतक्या दिवसांत पहिल्यांदाच इतक्या सकाळी उठल्यामुळे परभणीचं सकाळचं दुर्मिळ रूप नजरेस पडतं आणि परभणी अशीही असते हे पाहून आनंद वाटतो. बाहेर थंडगार हवा सुटलेली असते, वसमत रोड अजून काहीसा पेंगतच असतो, वाहनांची गर्दी व्हायला अजून अवकाश असतो आणि  नाही म्हणायला जॉगिंगवाल्यांची वर्दळ असते, खानापूर फाट्याजवळच्या कृष्ण मंदिरातल्या कृष्णाला मी दुरूनच नमस्कार करतो, काळ्या कमानीला अन गुलमोहर हॉटेललासुद्धा अजून जाग आलेली नसते, त्यापुढे पेट्रोल पंप अन शिवाजी कॉलेजसमोरचे कॉम्प्लेक्स निपचित असतात आणि त्यासमोर अजून झोपेतच असलेलं गार्डन दिसतं, मग अजून पुढे शिवाजी पुतळा आणि बी. रघुनाथ सभागृह शांतपणे उभे असलेले दिसतात आणि रेल्वे स्टेशन आल्याची चाहूल लागते. हे सगळं मी डोळ्यांत साठवून ठेवत असतो आणि पुढच्या खेपेला रोज सकाळी लवकर उठून हे सगळं अनुभवायचा निश्चय करून टाकतो. 

असंच आयुष्याचंसुद्धा असावं. आयुष्याच्या संध्याकाळी किती विचार येत असतील मनात, नाही का? तिथे तर काहीच बरोबर येणार नसतं, आठवणीसुद्धा नाही आणि परत यायचीसुद्धा सोय नसते. ते जाणं कायमचंच असतं.  इतके दिवस ज्यांच्या सहवासात घालवले ती माणसे; जिथे राहिलो, जगलो ते घर, तो परिसर; हे जग; अगदी सगळंच काही सोडून जावं लागणं ही कल्पनाच किती भयंकर आहे. 

बुधवार, ४ सप्टेंबर, २०१३

भयंकर डिप्रेशन

आज आपल्याला भयंकर डिप्रेशन आलंय. त्यामुळे काहीतरी भारी असं आपल्या हातून लिहिलं जाण्याची लई दाट शक्यता आहे. त्यासाठी डोक्यातली झाडून सगळी अक्कल पणाला लावली आहे. पण अजून लई भारी असं काही उगवलं नाही. पण हे चांगलं आहे. जेवढं उशिरा उगवेल तेवढं ते भारी असेल असं आम्हांला वाटतंय. रूममधली ट्यूब वगैरे बंद करून अंधार केला आहे, एकदम जुनी जुनी मराठी गाणी मंद आवाजात लावली आहेत. म्हणजे एकूणच सुपीक वातावरण तैय्यार है. फक्त एखादी भन्नाट आयडिया उगवायला उशीर कि टिपलीच म्हणून समजा. 

बुधवार, २८ ऑगस्ट, २०१३

गुरुदेव

आमच्या परम पूज्य गुरूदेवांचा महिमा वर्णावा तो किती. सहा शास्त्रे, आठरा पुराणे, वेद, स्मृती, श्रुती यांनासुद्धा अगम्य असं त्यांचं व्यक्तिमत्व. आमच्या सुदैवाने ते सगुण ,साकार आहेत. पण बरेचदा त्यांचं दर्शन दुर्लभ असतं. आमच्याशी फक्त आंतरजालावरून संपर्क ठेवतात. तेव्हा ते निर्गुणच असतात. ते माणूस या क्षुद्र संकल्पनेच्या कितीतरी परे आहेत. आणि समोरचासुद्धा, म्हणजे त्यांचा शिष्य, हा त्यांच्याच मार्गावर असेल असे त्यांना वाटत असते. आणि ते असं काही गूढ, अगम्य बोलतात कि आम्ही दंग होऊन जातो कारण त्यांच्या एक दीड तासाच्या प्रवचनानंतरसुद्धा आम्हांला त्यातलं अवाक्षरही कळलेलं नसतं. त्यातलं त्यांना कितपत कळतं हा अजून संशोधनाचा विषय (ओपन प्रॉब्लेम )आहे.

त्यांच्या कक्षात जाणं हा एक दिव्य अनुभव असतो. तिथे जाण्यापूर्वी तुम्ही तुमच्या सर्व क्षुद्र इच्छांवर (म्हणजे भूक वगैरे) विजय मिळवला असला पाहिजे. कारण तिथे गेल्यावर तास दीड तास तरी तुम्ही बाहेर येऊ शकत नाही. फक्त तुम्ही, गुरुदेव आणि तुमच्या बुद्धीचा गोंधळ याचंच आत अस्तित्व असतं.  तुम्ही आत शिरता आणि ते तुम्हांला थोडा वेळ वाट पाहायला लावतात. ही तुमची परीक्षा असते. तो थोडा वेळ दहा मिनिटांपासून ते एक तासापर्यंत असू शकतो. मग ते तुमच्याकडे मोर्चा वळवतात. आणि तुमचं काहीही ऐकून न घेत आपलं प्रवचन सुरु करतात. त्यांचं प्रवचन ऐकत असतानाच तुमचं म्हणणं त्यांच्या गळी उतरवणं हे खरं संवाद कौशल्य. पण ते तुमच्या बोलण्याकडे मुळीच लक्ष देत नाहीत. ते कधी झोपतात (किंवा कधी झोपत नाहीत) हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. कारण संगणकामध्ये ते जेव्हा काही शोधतात तेव्हा हमखास रस्ता चुकतात आणि त्याचं कारण म्हणजे ते रात्री झोपलेले नसतात. तसे ते २४ तास निद्राधीन असतात असा आमचा अंदाज आहे. पण यावर अजून प्रकाश टाकावा लागेल. 

त्यांचा आम्हां शिष्यांवर खूप विश्वास आहे. एवढा कि कोणत्याच कार्यात आम्हांला मदत करणं त्यांना आवडत नाही. आम्ही ते करायला समर्थ आहोत अशी त्यांना खात्री असते. पण अधूनमधून (म्हणजे तीन महिन्यातून एकदा) ते आमच्या कार्याचा आढावा घेत असतात आणि आपल्या अमोघ वाणीने आम्हांला असंख्य अशा सूचना करत असतात. त्याही आमच्या अल्पमतीच्या परिघात येत नाहीत. यात त्यांना दोष कसा द्यायचा. गरजेनुसार शिकण्यावर (नीड बेस्ड लर्निंग) त्यांचा नेहमी भर असतो. आवश्यकतेपेक्षा जास्त विषय शिकायचे कशाला असं त्यांचं ठाम मत आहे. 

अजून किती म्हणून लिहू त्यांचा महिमा. शब्दच ज्यांच्या वाणीने गोंधळून जातात तिथे आम्ही अल्पमती काय लिहिणार. त्यांनी आम्हांला अनुग्रह दिला यातच आम्ही धन्य झालो. आता फक्त इहलोकीची इतर कर्तव्ये करण्यासाठी आमची इथून मुक्तता करावी एवढीच इच्छा, कारण आम्ही इथे कायमस्वरुपीच आलो आहोत असा त्यांचा (गैर) समाज झालेला दिसतोय. 

शनिवार, १३ जुलै, २०१३

समाजविदारक

आज समाजसुधाराक असल्याचा आव आणून समाजातल्या अनिष्ट गोष्टींवर बोलण्या/लिहिण्याऐवजी कुठल्या तरी धर्माला टार्गेट करून त्यावरच टीकेचा भडीमार करणाऱ्या समाजविदारकांची संख्या खूप वाढली आहे. म्हणजे वरवर पाहता हे खूप मोठे तत्त्वज्ञ किंवा विचारवंत असे भासतात पण समाजाला सुधारणे हा त्यांचा हेतू नसतो तर फक्त धर्माला नवे ठेवणे, त्यात दोष शोधणे, एखाद्या विभूतीचं वस्त्रहरण करणे असलाच हेतू असतो अन तेच उद्योग हे करत असतात. अनिष्ट रूढी, परंपरा यांना विरोध जरूर असावा. जे जे अनिष्ट आहे ते धर्माने त्यागावं आणि काळानुरूप बदलावं तरच तो धर्म टिकेल.  पण केवळ अनिष्ट रुढींचा अंतर्भाव आहे म्हणून तो धर्मच वाईट ठरवणं हे कुठलं शहाणपण? पायात काटा घुसल्यावर काटा काढायचा कि पायच कापून टाकायचा? हे असले समाजविदारक म्हणजे पाय कापून टाकण्याचा सल्ला देणाऱ्या डॉक्टरसारखे आहेत. 

शुक्रवार, ५ जुलै, २०१३

पाऊस: तेव्हा


मी सहावी सातवीत असेल. शाळा घरापासून जवळपास एक-दीड किमीवर होती.    शाळेवर टीनची पत्रे होती. तेव्हाचा पाऊस पण माझ्या एवढाच होता. कधी कधी दुपारीच मध्यंतरनंतर आभाळ भरून यायचं. काळंकुट्ट व्हायचं. शाळेच्या अवती भवति सगळी शेतंच शेतं होती. आणि माझी जागा नेमकी विंडो सीट असायची. मग काय बाहेर एकदम मस्त चित्र दिसायचं. शेतांमध्ये कुठे भुईमुग, कुठे ज्वारी, कुठे ऊस, कुठे कापूस अशी पिकं डुलत असायची. आणि ढगाळ वातावरणात पिकांचा हिरवा रंग अजूनच खुलायचा. थंड वारा सुटायचा. खिडक्यांची आदळ आपट व्हायची. शिकणं शिकवणं बाजूलाच राहायचं. सगळेच मग पावसाचा आनंद घ्यायला सज्ज व्हायचे. थोड्याच वेळात मग एक थंड झुळूक यायची आणि त्यामागोमाग हलक्या सारी उतरायच्या. पत्रांचा आवाज व्हायचा. ते एक संगीतच असायचं. मग त्या आवाजामध्ये आम्हा मुलांचा आवाज मिसळून जायचा. बोलायला तेवढीच संधी मिळायची. आता इथून पुढचे तास होणार नाहीत याचा अजून आनंद असायचा. मग कुठे कुठे पत्रे गळायला लागायची. बेंचेस मागे पुढे सरकवले जायचे. मग मध्येच विजेचा कडकडाट. पण त्याला कोण जुमानतो? शाळेचं ग्राउंड ओलं चिंब होऊन जाई. त्यावरचे खोखोचे पोल्स स्थितप्रज्ञपणे भिजत उभे असायचे. नवीनच लावलेली नारळाची आणि इतर झाडं पावसात नाहून निघायची. शाळेच्या भिंतींतून पाणी झिरपू लागायचं. बाहेर एखादं कुत्रं अंग चोरून झाडाशी उभं असलेलं दिसे आणि त्या बिचाऱ्याची दया येई. रस्त्यावरून एखादीच भिजत जाणारी सायकल दिसे. हवेसोबत उडणारे पावसाचे फवारे बघायला अजूनच मजा येई. मग पाऊस कमी झाला कि शाळा सुटायची. आणि सगळे एकदम गोंधळ करत वर्गाबाहेर पडायचे. पावसाशी पाठशिवणीचा खेळ सुरु व्हायचा. त्यानं गाठायच्या आत घरी पोचायचं असे. पण तो कसला आम्हांला कोरडा सोडतोय? बरोबर अर्ध्या वाटेत आलं कि गाठायचा. आणि तो येताना दिसायचा. कधी कधी आम्हांला समांतर शेतांतून चालायचा. पण मग आमच्याकडे मोर्चा वळायचाच त्याचा. मग काय छत्री असेल तर तिचा आडोसा नाहीतर भिजत जायचं. भिजल्याच्या भीतीपेक्षा भिजल्यावर घरी रागावतील याचीच भीती असायची. पण तरीही सगळ्यांसोबत भिजायला मस्त वाटायचं. रस्त्यांवरून ओहाळ वाहायला लागायचे. त्यातून चालायला मजा यायची. एखादं वाहन आलं कि सगळे रस्त्याच्या खाली उतरायचो. पण तरीही पाणी उडून अंगावर यायचंच. मग सगळे एका आवाजात  त्याला ओरडायचे. एखाद्या झाडाखालून जाताना आमच्यावर पाणी उडवून ते झाड सुद्धा आम्हांला भिजवून टाकीत असे. तेव्हा जे शिकलो, जे घडलो ते या पावसाच्याच साक्षीनं, याच्याच सान्निध्यात. आताही तो आला कि या आणि इतरही सगळ्याच पावसाळी आठवणी घेऊन येतो. मनाला ओलं चिंब, हिरवं करून टाकतो. 

आठवणींना धुमारे 
मनाला शहारे 
गर्द हिरवे नजारे 
म्हणजे पाऊस 

मनाचं चिंब होणं 
आठवणींत धुंद होणं 
मृद्गंधाचं मंद दरवळणं  
म्हणजे पाऊस 



गुरुवार, ४ जुलै, २०१३

अश्वत्थामा

(डोक्यावर भळभळणारी जखम आणि अमरत्वाचा शाप घेऊन मरणाची वाट बघणाऱ्या अश्वत्थाम्याची व्यथा. )

जगणं सरलं आयुष्य उरलं 
मरणाची आता वाट बघतोय 

दिवस सरला अंधार उरला 
पसरत जाणारी रात बघतोय 

तेल सरलं दिवा विझला 
उरलेली मागे वात बघतोय 

कर्तृत्व सरलं नशीब उरलं 
आशेनं मोठ्या तळहात बघतोय 

चुकलेल्या वाटांचं प्रतिबिंब पुन्हा 
भळभळणाऱ्या घावात बघतोय