परभणीसारख्या छोट्या रेल्वे स्टेशनवर सकाळी आणि संध्याकाळी प्रवाशांची, विशेषतः अप-डाऊनवाल्यांची, प्रचंड गर्दी असते. आणि त्यातले ९० टक्के लोक रूळ ओलांडण्यासाठी दादऱ्याचा वापर करण्याची तसदी घेत नाहीत. प्लाटफॉर्म वरून उडी मारून रूळ ओलांडायचा जन्मसिद्ध हक्कच. आणि यातले बरेच लोक ऐन गाडी सुटायच्या वेळी प्रकट होतात. मग चालत्या रेल्वेत चढायची धावपळ सुरु होते.कुणी वेगात असलेल्या रेल्वेत शिरतात, कुणी शिरू पाहतात, कुणी प्लाटफॉर्म एकवर उभ्या असलेल्या गाडीतून पलीकडे प्लाटफॉर्म दोनवरच्या गाडीत जाऊ पाहतात आणि दोन्ही गाड्या चालू होतात. ही असली स्टंटबाजी पाहून इकडे प्लाटफॉर्मवर मी श्वास रोखून त्यांच्या सुरक्षेची चिंता वाहत असतो आणि माझ्याच हृदयाचा ठेका चुकतो. पण मनोमन या असल्या स्टंटबाजांचा खूप रागही येतो. उगाच जीव टांगणीला लावतात माणसाचा. त्यापेक्षा जरा लवकर आलं तर काय बिघडतं? खरं तर मला चिंता करायची मुळीच गरज नाही पण तरीही कन्सर्न हा मानवाचा स्वभाव विशेष आहे, नाही का?
आम्हां घरी शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करुं ।। शब्दचि आमुच्या जीवांचे जीवन । शब्दें वाटू धन जनलोका ।। तुका म्हणे पहा शब्दचि हा देव। शब्दचि गौरव पूजा करुं ।।
सोमवार, १७ जून, २०१३
शुक्रवार, १४ जून, २०१३
...पण टाईम नाही ना राव.
आजकाल ना वेळच पुरत नाही राव. संध्याकाळी पाच सहा वाजता labमधून आलं कि एक-दीड तास बॅडमिंटन, मग मेसवर जाऊन जेवण, मग सायकलवर जी. सी. पर्यंत फेरफटका आणि नाऊ वाजतात. मग जरा वेळ काही वाचलं किंवा फोनवर घरी बोललं किंवा एखाद दुसरं गाणं ऐकलं कि दहा. आणि मनाचा काउंटडाऊन सुरु होतो. आता झोपायला हवं असं म्हणत म्हणत टाईम पास होतच असतो. आणि शिवाय दहा वाजता जरी आडवा झालो तरी एक दोन वाजेपर्यंत उगाच पडून राहावं लागतं. झोपच येत नाही ना. मग मनाची मुक्त भटकंती चालते. कधी स्वप्नं, कधी plans, कधी कल्पनाविलास. मग दोन तीनच्या सुमारास नकळत स्वारी निद्राधीन होऊन जाते. आणि नेहमीप्रमाणेच सकाळी उठायला साडेआठ नाऊ वाजतात. मग ब्रेकफास्ट मिस होतो. अंघोळ वगैरे करून झालं कि डिपार्टमेंट, मग कँटीनमध्ये चहा बिस्कीट खाऊन lab. मग एखादा रिसर्च पेपर काढून वाचत बसणं त्यातही दहा वेळा gmail आणि facebook चेक करणं, मग एखादा कन्सेप्ट नाही समजला कि त्याचे बेसिक्स वाचणं असं करत करत साडेबारा वाजतात मग जेवायला जायचं असतं. एक दीड वाजता जेऊन आल्यावर परत तोच पेपर. आता त्यातली अक्षरे धुसर दिसायला लागतात. दोन दोन आकृत्या दिसायला लागतात. निद्रा आणि जागृती असं तळ्यात मळ्यात स्विचिंग चालू होतं. हा स्विचिंग फेज एक दीड तासांचा असतो किंवा कधी कधी दोन तासांचासुद्धा. यामधून बाहेर पडण्यार्थ अजून एक कँटीन दौरा निघतो. दांडी यात्रेसारखे बरेच जन तिथे येउन मिळतात. मग जगाच्या पाठीवरचे गंभिरेश्ट विषय घेऊन त्यावर खल होतो. आपलं मत मांडण्यार्थ एकेक जण पुढे सरसावतात. आता रिसर्च स्कॉलर म्हटल्यावर सर्वांचाच सर्वच विषयांचा सखोल अभ्यास असणार हे वेगळं सांगायला हवं का?(:p). एव्हाना साडेतीन चार वाजलेले असतात. मग स्वारी परत labमध्ये. जरासं वाचणं होतं. सकाळी डोक्यात उगवलेल्या आयडियाज आता असंबद्ध वाटायला लागतात. मग थोडंसं मंथन केलं कि काही नवीन आयडीयाज उगवतात. पण दिवसभर कसली कसली गणिती भुतं पाहून प्रोसेसर आता जाम गरम झालेला असतो. अधून मधून हँग व्हायला लागतो. मग बाकी सगळं उद्यावर सोडून स्वारी labच्या बाहेर पडते… आणि एक सर्किट कम्प्लीट होतं. हे सर्किट ब्रेक करायचं स्वारीच्या मनी आहे. पण टाईम नाही ना राव.
गुरुवार, १३ जून, २०१३
शब्दांचा ढीग
कधीकधी आपण गणपती करायला जातो पण त्याचा मारुती होतो. याचं उदाहरण म्हणजे खालचा परिच्छेद. उगाच जुळवून आणलेल्या शब्दांचा ढीग. टारझनसारखं एक पारंबी सोडून दुसरीला लटकायचं असं केलंय. आणि शेवटी जिथून निघालो तिथे परत. केकुलेच्या स्वप्नातल्या सापासारखं.
आपण आधी सुखाच्या मागे धावतो मग एकदा का ते मिळालं कि आपला भूतकाळ कुरवाळत बसतो. सुखाच्या सावलीत दुःखाच्या झळा जाणवत नाहीत. भलेही ते कितीही तीव्र असो. भूतकाळच तो. त्या दुःखाचे व्रण तेवढे मनावर राहतात. काळाबरोबर ते धुसर होत जातात. तरीही त्यांना आपण किती जपतो! मुळात सुखी राहण्याची माणसाची प्रवृत्तीच नाही का? बरं एवढ्यावर कुठे आपलं समाधान होतं? आपली दर्दभरी कहाणी कुठेतरी कथन करावी असा अट्टाहास. आपण जे भोगलंय, जे सोसलंय, ज्या धैर्यानं कठीण प्रसंगाला तोंड दिलंय त्याची स्टोरी ऐकणारं कुणीतरी हवं असतं. मग अर्थातच त्या कथेचं उदात्तीकरण आलं. इथे ऐकणाऱ्या व्यक्तीची सहमती आणि सहानुभूती अपेक्षित असते. इथेच नात्यांची गरज निर्माण होते. नातं मग ते कसलंही असो त्यात ओलावा हवा. ओलावा नसलेली नाती रुक्ष असतात. वठलेल्या झाडासारखी. ती सावलीही देत नाहीत आणि फळेही. ती असली तरी नसल्यासारखीच. त्यांचा आधार वाटण्यापेक्षा ओझंच वाटत राहतं. असली ओझी डोक्यावरून उतरवताही येत नाहीत. ती तशीच आयुष्यभर वाहावी लागतात. आयुष्यात असल्या नात्यांसारखीच कितीतरी ओझी आपण वाहत असतो. आणि आयुष्य बोजड करून टाकतो. त्यामुळे समोर आलेलं सुखही आपल्याला नीट दिसत नाही. त्याला डावलून आपण पुढे जातो. अज्ञात सुखाच्याच मागे धावत. आपण आधी सुखाच्या मागे धावतो मग एकदा का ते मिळालं कि आपला भूतकाळ कुरवाळत बसतो…
रविवार, ९ जून, २०१३
लहानपण
आयुष्याच्या एका टप्प्यावर लहानपण हरवलं आणि आता किती किती दूर आलो त्यापासून. इथून ते नीट दिसतसुद्धा नाही. धुसरलेल्या काही आठवणी तेवढ्याच तरळत राहतात. दुःख ते लहानपण हरवल्याचं नाही कारण एका मुक्कामावर ते हरवणारच होतं. दुःख आहे ते त्याबरोबर बरंच काही गमावल्याचं. ती निरागसता, तो जगण्यातला मनमुरादपणा आणि बरंच काही हरवत गेलं. अजून किती आठवणी म्हणून आहेत श्वासांत, गंधांत,स्पर्शात, हृदयात, डोळ्यांत साठून राहिलेल्या. पण फक्त आठवणीच तेवढ्या. त्यांच्यापर्यंत आता पोहचता येत नाही. त्या शब्दांच्या आवाक्यातसुद्धा येत नाहीत.
गुरुवार, ६ जून, २०१३
आनंद
जीवनात आपण नेहमी कशाच्या तरी शोधत असतो, पण ते नेमकं काय असतं हे आपल्यालाही ठाऊक नसतं. खरं तर अगदी सगळीकडे, म्हणजे चित्रपट, गाणी, कविता, साहित्य, नाती-गोती, सखे-सोबती वगैरे सगळ्यांमध्येच आपण आनंद शोधत असतो. यांपैकी काही ठिकाणी तो मिळतोसुद्धा. मुळात आनंद आपल्यातच असतो. पण बऱ्याच वेळा बाहेर शोधूनही कुठे न सापडल्याने आपण निराश होतो. आपल्याला एकदम मोठं काहीतरी मिळवायचं असतं, मोठ्या आनंदासाठी. आणि त्या मोठ्या आनंदाच्या शोधत कुठेतरी आपण छोट्या छोट्या गोष्टींतून मिळणाऱ्या आनंदाकडे दुर्लक्ष करतो. आणि मृगजळाप्रमाणे तो मोठा मासा काही आपल्या गळाला लागत नाही.
मंगळवार, ५ मार्च, २०१३
रामेश्वरम
![]() |
| पाम्बन ब्रिज |
![]() |
| रामेश्वरम बेट (गुगल mapवरून ) आणि आग्नेयेला रामसेतू |
![]() |
| पाम्बन ब्रिजच्या जवळ |
आपण रामेश्वरममध्ये येतो आणि त्या ज्योतिर्मय शिवशंकराच्या दर्शनाची ओढ लगते. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल हे वैभवशाली ज्योतिर्लिङ्ग. बाराव्या शतकात पांड्या राजांनी बांधलेल्या या मंदिराचा गाभारा भारतातल्या सगळ्या मंदिरांत लांब आहे. मंदिराला दोन प्रवेश द्वारे आहेत- एक पूर्व द्वार आणि दुसरं पश्चिम द्वर. आत प्रवेश पश्चिम द्वारातून आहे. पण प्रवेशापूर्वी काही जण मंदिरात असलेल्या बावीस तीर्थांमध्ये स्नान करून घेतात. मग शिवाच्या भेटीसाठी दर्शनाच्या रांगेत तिष्ठत उभे रहतात. शिवशंभुला प्रत्यक्ष आणि मनोमन कित्येक नमस्कार करून त्याच्याशी संवाद चालू होतो. मन पवित्रतम होते. राग, लोभ वगैरे षडविकारांचा लवलेशही राहत नाही. आणि मग बराच वेळ तिष्ठत काढल्यावर एकदा तो शिव दर्शनाचा अमृतयोग येतो. भव्य अशी ती शिवपिंड पाहून कृतार्थ झाल्याची भावना होते.
इथे अवघ्या भारतातून येणाऱ्या भक्तांची गर्दी बाराही महिने असते. आश्चर्य म्हणजे महाराष्ट्रातून येणाऱ्या भक्त जणांची संख्या सुद्धा लक्षणीय असते. त्यामुळे इथे मराठी, मारवाडी, गुजराती, उत्तर भारतीय अशी (फक्त) हॉटेल्स (जेवण नाही) आढळून येतात.
देवदर्शन झाल्यावर त्याची निर्मिती असलेल्या भव्य निसर्गाचं दर्शन करण्यासाठी आम्ही धनुषकोडीला जायला निघालो. धनुषकोडी रामेश्वरम बेटाच्या आग्नेय टोकावर एकेकाळी असलेलं गाव. १९६४ च्या चक्री वादळात तिथल्या बऱ्याच रहिवाशांसह नष्टप्राय झालेलं. तेव्हापासून तमिळनाडू सरकारने मानवी वस्ती साठी अयोग्य म्हणून घोषित केलेलं. तरीही इथे तुरळक वस्ती आहे. शिक्षण तर सोडाच वीज सुद्धा माहिती नसलेली ही वस्ती. पर्यटन हाच इथल्या उपजीविकेचा मुख्य पर्याय . थोड्या फार प्रमाणात मासेमारी करून, सागरी शंख शिंपले विकून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. रामेश्वरम हून जाणारी बस जुन्या धनुषकोडीपर्यंत जात नाही. मध्येच जिथपर्यंत पक्का रस्ता आहे तिथ पर्यंत सोडते. तिथून पुढे रामसेतू कडे जाण्यासाठी रस्ता वगैरे नाही. आणि ट्रान्स्पोर्टचं एकमेव साधन म्हणजे खासगी वाहने. जणं आणि येणं शंभर रुपये पर हेड. आणि तिथे अर्धा तासच थांबायला भेटतं. सगळा प्रवास रेतीमधून. जायला अर्धा तास लागतो.
जीपमध्ये बसून निघाल्यापासून पंधरा मिनिटांत आम्ही मधल्या एका मुक्कामावर पोचलो. इथे जुन्या रेल्वे स्टेशनचे, चर्चचे अवशेष पाहायला मिळतात. इथेच एका झोपडीसदृश मंदिरात एक तरंगता दगड सुद्धा बघण्यात आला. तो प्रवाळाचा असावा. आमचा जीप ड्रायवर गाईडचीसुद्धा भूमिका बजावत होता. इथेच पाण्यासाठी खोदलेले विहीर वजा खड्डे पाहायला मिळाले. अवशेषांचं दर्शन करून करून आम्ही पुढे निघालो. आता उजव्या बाजूला शांत हिंदी महासागर आणि डाव्या बाजूला बंगालचा उपसागर असं दृश्य दिसू लागलं. दोहोंच्या मध्ये असलेल्या शे-सव्वाशे फुट रुंदीच्या पट्ट्यावरून आमची जीप जात होती. हा रामसेतू.
![]() |
| रामसेतू: भारत भूमीचं टोक. इथून जवळपास दहा किलोमीटरवर श्रीलंका (फोटो सौजन्य: गुगल) |
आणि एकदाचे आम्ही त्या टोकावर पोहचलो. इथला निसर्ग काय वर्णावा ? अथांग पसरलेला तरीही शांत असा हिंदी महासागर, उधणणारा बंगालचा उपसागर, त्यांच्या मधला जमिनीचा अरुंद पट्टा, त्यावर मोजकेच पर्यटक, दूर समुद्रात दिसणारी जहाजे, डोक्यावर तळपणारा सूर्य, सुसाट वाहणारा वारा, नितळ निळं पाणी असं ते नितांत सुंदर दृश्य शब्दांच्या आवाक्यात येतच नाही. मी, प्रशांत, नगेन्द्रन आणि विशाल असा आम्हा चौघांचा ग्रुप. पैकी माझी बहुतेक वेळा फोटोग्राफारची भूमिका असायची. बाकी तिघे समुद्रात उतरून मनसोक्त भिजत होते. मी मात्र किनाऱ्यावरच उभा राहून सृष्टी सौंदर्य डोळ्यांत, श्वासांत, हृदयात आणि कॅमेऱ्यात भरून घेत होतो.

![]() |
| विशाल, प्रशांत आणि नगेन्द्रन |
त्या निळ्याशार, फेसाळणाऱ्या सागराला पाहून सगळ्या चिंता, सगळी टेन्शन्स कुठल्या कुठे पळून गेली. राहिलो फक्त मी आणि आनंद. इथे निसर्ग भव्य आणि सुंदरही आहे. आपलं अस्तित्व विसरायला लावणारं त्याचं ते रूप. रामाच्या चरणांनी पवित्र झालेल्या त्या भूमीशी येउन सागरही प्रसन्न झालेला. आणि आपल्या अक्षय आनंदाची अभिव्यक्तीच तो त्याच्या लाटांमधून करत असेल.
सुमारे तासभर तिथे घालवल्यानंतर आमचा धनुष्कोडीकडे परतीचा प्रवास सुरु झाला. किंबहुना ड्रायवरला दुसऱ्या ट्रीपची घाई असल्याने आम्हांला परतावं लागलं. परतीच्या वेळी जीप मधून टिपलेली ही काही क्षणचित्रे
![]() |
धनुष्कोडीला आम्ही सुमारे साडेचार पाच वाजता पोहचलो. तिथेही मी वगळता बाकीच्या त्रिकुटाला समुद्रात उतरायची लहर आली. इथे लाटा बऱ्यापैकी उंच होत्या. सूर्य आता पश्चिमेकडे झुकला होता. पण तो मावळतीचा क्षण टिपायला कॅमेऱ्यात त्राण उरले नव्हते. म्हणून तो क्षण डोळ्यांतच साठवून आम्ही रामेश्वरमकडे परत निघालो.
मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१३
एक धागा सुखाचा
'उद्या'च्या गर्भातून डोकावणाऱ्या आशेच्या सोनेरी किरणांच्या बळावर आपला 'आज' सुसह्य होत असतो. उद्याच्या उंबरठ्यावर गेल्यावरही तिथे अंधार पाहून थोडीशी निराशा होते. पण त्यालाही सोनेरी आशा उरी बाळगणारा 'उद्या' असतो. हे अविरत चालूच राहतं. कधीकधी तो सोनेरी क्षण हाती लागतोसुद्धा. पण ज्यासाठी हा आटापिटा केला होता त्याचं आयुष्य फक्त एका क्षणापुरतंच ही जाणीव मात्र उद्विग्न करते. मग त्या सोनेरी क्षणाचा आनंद अन विरह असा संमिश्र भावकल्लोळ. आणि तो किंवा तसा क्षण पुनः प्रकटावा यासाठी परत 'आज' 'उद्या'चा खेळ आणि मध्येच दही दिशांनी चालून येणारे काही काळेकुट्ट क्षण, त्या सोनेरी क्षणांपेक्षा कैक पटीने महाकाय. कधीकधी प्रश्न पडतो हेच का आयुष्य? त्या सुखाच्या, आनंदाच्या एका धाग्यासाठी दुःखाचे, विरहाचे,उद्वेगाचे शेकडो धागे गुंफून बनवलेलं जरतारी आयुष्याचं वस्त्र ल्यायचं? नियती देईल ते मुकाट पदरी पडून घेऊन आनंदी असल्याचं स्वतःलाच सांगायचं? का नाही बंड करायचं याविरुद्ध? आम्हांला सुखाचे शेकडो धागे असलेलं जीवनवस्त्र हवंय. किंमत बोला...!!!
सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१३
गर्दी
गर्दीचा मला भयंकर तिटकारा वाटतो. गर्दीत मिसळणारा प्रत्येकच जण आपला चेहरा, आपली ओळख, आपल्या भावना सर्व काही हरवून गर्दीत शिरतो आणि त्या यंत्रवत समूहाचा भाग होऊन जातो. भीतीचं एक वलय नेहमी आपल्या भोवती घेऊनच त्या गर्दीत वावरतो. गर्दीला दिशा नसते. भरकटलेल्या थव्यासारखी ती फक्त गतिमान असते. त्यातल्या प्रत्येक पाखराची दिशा वेगळी, दशा वेगळी ...प्रत्येक जण आपल्यापुरताच. माणुसकीचा ओलावा आटून गेलेला.
शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३
आपले पोलिस आणि सरकार यांना तहान लागल्याशिवाय विहीर खोदायची गरज वाटत नाही. जेव्हा कुठेतरी स्फोट होतो तेव्हाही हे एकमेकांच्या डोक्यावर खापर फोडण्याशिवाय दुसरं काहीही करत नाहीत. सरकार पोलिसांवर, पोलिस गुप्तचर यंत्रणेवर खापर फोडून जबाबदारी झटकू पाहतात. मग 'तपास चालू आहे', 'हे सहन केलं जाणार नाही', असल्या पोकळ गप्पा मारल्या जातात. त्यांच्यात काहीही तथ्य नसतं. इतके स्फोट झाले आजपर्यंत, तरीही यांचं दरवेळी बेसिकपासूनच सुरु होतं. आतापर्यंत एक predictive model नाही बनवता आलं यांना? नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही हे शेंबड्या पोरालाही कळतं, मग का नाही पाकिस्तानचं नाक दाबत? या स्फोटाचा कट इस्लामाबादमध्ये शिजला हे उघड आहे. मग का पाकिस्तानशी असलेले संबंध नाही तोडत? पण नाही... इथे आपल्या मंत्रिमंडळात बरेच पाकधार्जिणे लोक बसलेत. आपल्या शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नाही आणि हे पाकिस्तानातून कांदा आयात करतात आणि इथे आणून तो सडवतात.
इथे स्फोटात लोक जीवानिशी जातात पण यांना काय त्याचं? ए.सी.मध्ये बसलेल्या त्यांच्यापर्यंत स्फोटाची झळ आणि आवाज दोन्हीही कसं पोचणार? नुसता स्फोट झाल्या ठिकाणी दौरा केल्याने प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी वेळीच प्रतिबंधक उपाय करावे लागतात आणि हितसंबंधांच्याही पलीकडे जाऊन निर्णय घ्यावे लागतात. उगाच ए.सी.मध्ये खुर्चीवर बसून दहशतवादाला रंग देत बसलं कि आपल्या XXखाली बॉम्ब ठेवला तरी पत्ता लागत नाही आणि हे असले स्फोट होतात.
सोमवार, ११ फेब्रुवारी, २०१३
मानवाधिकाराचे मक्तेदार
पुन्हा एका फाशीच्या निमित्ताने मानवाधिकाराचा डंका वाजवणाऱ्यांना निमित्त मिळालंय. 'द हिंदू' या इंग्रजी वृत्तपत्राने तर अफझल गुरूला दिलेली फाशी कशी चुकीची आणि अन्यायकारक आहे यावरून लेखांचा भडीमार केला आहे. मागे कासाबच्या फाशीच्या वेळीही काही मानवाधिकाराच्या मक्तेदारांना भरून आलं होतं. आणि आता अफझल गुरूसाठी ह्यांची एकच रडारड कि त्याला प्रतीवादाची पुरेशी संधी नाही देण्यात आली, त्यावरचे आरोप सिद्ध करण्यासाठी वापरलेले पुरावे पुरेसे नव्हते, इत्यादी. यांच्या लेखी दहशतवादी तेवढेच मानव. त्यांच्यामुळे नाहक बळी गेलेल्यांच्या मानवाधिकाराचं काय? जेव्हा कसाबच्या बंदुकीतून सुटणाऱ्या गोळ्या शेकडो निरपराध्यांचे प्राण घेऊन जात होत्या तेव्हा त्यांचा काय दोष होता? त्यांच्यावरचे कुठले आरोप सिद्ध झाले होते? भारताच्या संसदेवर हल्ला झाला तेव्हा तिथे ज्या सुरक्षारक्षक आणि जवान यांना हौतात्म्य आलं त्यांच्या जगण्याच्या मुलभुत अधिकाराचं काय? त्यांच्या कुटुंबावर जो प्रसंग ओढवला त्याचं काय? जेव्हा इथे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबून आत्महत्या करतात तेव्हा मानवाधिकाराच्या नवे ओरडणाऱ्या तथाकथित बुद्धीजीवींची दातखीळ बसते कि काय? काश्मीरमधील फुटीरवाद्यांच्या मानवाधिकारांची चिंता करणाऱ्यांना भारतीय सेनादलातील जवानांचे बलिदान दिसत नाही का?
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)











